रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुडवडा; रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ

April 08, 2021 0 Comments

म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई वैद्यकीय उपचारात रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपयोगी पडत असले तरीही या इंजेक्शनची उपलब्धता बुधवारी मुंबईमध्ये नव्हती. खासगी रुग्णालयामधील रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले जात होते. इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे त्याची उपलब्धता होऊ शकत नाही, असे अधिकृत विक्रेत्यांकडून सांगितले जात होते. अनेक रुग्णांचे एचआरसीटीचे अहवाल खराब आहेत तसेच त्यांना धाप लागणे, कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे तापही येत होता. डॉक्टरांनी त्यांना रेमडेसिवीर द्यावे लागेल, असे सांगितल्यानंतर मुंबईतील अनेक रुग्णांचे नातेवाईक सातत्याने सगळीकडे विचारणा करत होते. ज्यांना हे इंजेक्शन कुठे मिळेल याची माहिती नव्हती त्या रुग्णांच्या नातेवाईकांचे चेहरे चिंतेमुळे काळवंडले होते. करोना नसलेल्या मात्र करोनासारखी लक्षणे असलेल्या रुग्णांनाही कुटुंबीयांच्या संमतीने देण्यात येत होते. आज सकाळी नऊ वाजता कोविडचे निदान झालेल्या ऐंशी वर्षांच्या सुनीता पाटील (नाव बदलले आहे) यांना अंधेरीतील रुग्णालयात दाखल केले होते. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे नातेवाईक या इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी विचारणा करत होते. मात्र पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील अनेक ठिकाणी या इंजेक्शनची उपलब्धता नसल्याचे उत्तर मिळाले. रात्री उशिरा त्यांना मीरा रोड येथे इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र एकच डोस शिल्लक होता. आजचे इंजेक्शन तरी मिळते आहे, हा विचार करून नातेवाईकांनी ते विकत घेतले. अनेक ठिकाणी इंजेक्शनच्या किंमती सरकारने आठशे ते नऊशे निर्धारित करून दिल्या असल्या तरीही ही इंजेक्शन्स वाटेल त्या किंमतीने विकली जात आहेत. त्यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. रुग्णांचे नातेवाईक उसनवारी करून ही इंजेक्शन्स विकत घेत आहेत. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळीही रुग्णांच्या नातेवाईकांची अशीच धावपळ झाली होती. एकीकडे सरकार औषधांची उपलब्धतेची तुटवडा निर्माण होणार नाही, असे आश्वासन देते मात्र त्याचवेळी इंजेक्शन उपलब्ध होत नसतील, काय करायचे असा प्रश्न इंजेक्शनची उपलब्धता न झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी 'मटा'कडे उपस्थित केला आहे. संबंधितांना निर्देश रेमडेसिवीरच्या उपलब्धतेसंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या इंजेक्शनच्या एमआरपी किंमती कमी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, तसेच इंजेक्शनची साठेबाजी केली जात आहे का, यासंदर्भातही कसून पाहणी करण्यात येणार आहे, असे सांगितले. इंजेक्शनची मागणी वाढत असली तरीही तितक्या क्षमतेने उपलब्धता होईल. यासंदर्भातील सर्व निर्देश संबधित कंपन्यांच्या प्रमुखांना दिल्याचे त्यांनी सांगितले. काळ्या बाजाराला चाप नाही इंजेक्शन कुठे मिळेल याची माहिती तसेच संपर्क क्रमांक जाहीर करण्याची विनंती रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने होत आहे. जे मेसेज समाज माध्यमांवरून व्हायरल होतात तिथे संपर्क साधला जातो. लोकांमध्ये इंजेक्शनच्या नेमक्या किंमतीसंदर्भात माहिती नाही. जे अतिरिक्त दरआकारणी करून विक्री करतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांना चाप लागत नसल्याचे त्यांनी सांगितले. खासगी केद्रांत वापर राज्यात सध्या चार लाख करोनाचे उपचाराधीन रुग्ण आहेत त्यापैकी १ लाख ५२ हजार रुग्ण रुग्णालयात असून त्यांच्यासाठी रेमडेसिवीरची एक लाख ३० हजार इंजेक्शन्स उपलब्ध आहेत. मागील पंधरा दिवसांत रेमडेसिवीरचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आरोग्य विभागाच्या प्रोटोकॉलप्रमाणे मध्यम ते तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी केवळ रेमडेसिवीर वापरावे, असे निर्देश आहेत. परंतु सध्या काही खासगी कोविड सेंटरमध्ये अगदी सुरुवातीपासून हे इंजेक्शन दिले जात असल्याच्या तक्रारी काही ठिकाणांहून आल्या आहेत. त्यामुळे खासगी करोना सेंटरमधील रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याची सूचनाही दिली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: