ते सुपर स्प्रेडर ठरत नाहीत ना? पोपटराव पवारांना शंका

April 25, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, नगरः करोनाचा विळखा आता शहरासोबतच ग्रामीण भागाला बसला आहे. उपचारानंतर घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांनी ठरवून दिलेल्या काळात गृहविलगीकरणात राहणे अपेक्षित असते. ग्रामीण भागात मात्र, याकडे दुर्लक्ष होत असून घरी आल्याआल्या रुग्ण गावभर फिरायला सुरवात करतात. त्यामुळेच ग्रामीण भागात संसर्ग वेगाने फैलावत असल्याची शंका आदर्श गाव संकल्प आणि कार्य समितीची कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे उपसरपंच यांनी व्यक्त केली आहे. त्यावर त्यांनी उपायही सूचविला आहे. सध्या यंत्रणा ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरच्या उपलब्धतेत जास्त व्यस्त असल्याने विलगीकरण आणि इतर नियमांच्या काटेकोर पालनाकडे दुर्लक्ष होत असल्याकडेही पवार यांनी लक्ष वेधले आहे. गेल्यावर्षीच्या लाटेत आदर्शगाव हिवरे बाजारला सुरक्षित ठेवण्यात गावकऱ्यांना यश आले होते. यावेळी मात्र हिवरेबाजारच नाही तर खेडोपाडी आणि वाड्यावस्त्यांपर्यंत संसर्ग पोहचला आहे. त्यामध्ये गृहविलगीकरणाकडे होत असलेले दुर्लक्ष हे एक प्रमुख कारण असल्याची शंका पवार यांनी उपस्थित केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे याकडे लक्ष वेधून पवार यांनी यावर उपाय सूचविला आहे. बरे झालेले रुग्णांना रुग्णालयातून थेट घरी न सोडता त्यांना संस्थात्मक विलगीकरणात सक्तीन पाठवावे. विहित कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात यावे, असा उपाय त्यांनी सूचविला आहे. पवार यांनी पत्रात म्हटले आहे, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिलेले रूग्ण थेट घरी पाठविले जातात. मात्र घरी गेल्यानंतर विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था नसल्यामुळे हे रुग्ण कुटुंबात व समाजात वावरतात. त्यामुळे इतर व्यक्तीना मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शहराबरोबर ग्रामीण भागात कोविड चा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु आहे. त्याचा प्रचंड ताण आरोग्य यंत्रणेवर आलेला आहे. तरी त्यासाठी स्वतंत्र नियमावली करून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिलेल्या पेशंटला घरी न नेता १४ दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात ठेवण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी स्वच्छतागृह, पाणी व राहण्याची चांगली व्यवस्था असेल असे मंगलकार्यालय, शाळा, कॉलेज ताब्यात घेऊन तेथे व्यवस्था करण्यात यावी. एखादा रुग्ण नजर चुकवून विलगीकरण कक्षात न जाता घरी गेल्यास पोलीस यंत्रणेला कळवून त्याच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. विलगीकरण कक्षात रुग्णाला वेळेवर औषधे, जेवण एवढीच व्यवस्था करण्याची गरज आहे. एखाद्या रुग्णाची प्रकृती पुन्हा बघडल्यास त्याला पुन्हा रुग्णालयापर्यंत पोचविण्याची जबाबदारी विलगीकरण कक्षाची असेल, असे आदेश देण्यात यावेत. सध्या संपूर्ण आरोग्य यंत्रणा ऑक्सिजन व इंजेक्शन यात व्यस्त असून तातडीने विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे, हेही लक्षात घेण्याची गरज आहे.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: