नांदेड: उपजिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डात डॉक्टरवर चाकूहल्ला
नांदेड: मुंबईत रुग्णालयातील कोविड वॉर्डात रुग्णाने नर्सवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, नांदेडमध्येही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. जिल्ह्यातील येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड वॉर्डात डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाइकाने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. राज्यावर संकट कोसळलं आहे. करोना संकटकाळात डॉक्टर, नर्स, इतर कर्मचारी हे जीवाची पर्वा न करता, रुग्णांची अहोरात्र सेवा करतात. असे असतानाही डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला होत असल्याच्या घटना घडत आहेत. मुंबईतील रुग्णालयात करोना रुग्णाने नर्सवर चाकूहल्ला केल्याची घटना घडली असतानाच, नांदेडच्या मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डात रुग्णाच्या नातेवाइकाने चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केला. कोविड वॉर्डात मोठ्याने बोलू नका, असे सांगितल्यावर रुग्णाच्या नातेवाइकाला राग आला. तो रागाच्या भरात हातात चाकू घेऊन डॉक्टरांच्या अंगावर धावून गेला. त्याने हल्ल्याचा प्रयत्नही केला. पण वॉर्डात असलेल्या इतर उपस्थितांनी आरोपीचा हात पकडला. त्याच्या हातातून चाकू काढून घेतला. त्यामुळे अनर्थ टळला. भाऊसाहेब गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: