ऑक्सिजन सिलिंडर बदलण्यास उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू?; प्रशासन म्हणते...
अहमदनगर: येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या वॉर्डात ऑक्सिजन सिलिंडर बदलण्यास उशीर झाल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र हा आरोप फेटाळला आहे. नातेवाईकांच्या तक्रारीची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील उपचारांसंबंधी नागरिकांच्या सतत तक्रारी असतात. त्यातच आता हा एक नवीन प्रकार समोर आला आहे. ऑक्सिजन उपलब्ध असला तरी केवळ सिलिंडर बदलण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा बळी गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाचा: जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक सहा मध्ये रविवारी ही घटना घडल्याचा दावा केला आहे. रुग्णाचा नातेवाईक असलेल्या एका युवकाने यासंबंधी व्हिडिओद्वारे तक्रार केली आहे. ऑक्सिजन सिलिंडर बदलेले जात असल्याच्या घटनेचा व्हिडिओ असून त्यात रुग्णांच्या प्रतिक्रियाही घेण्यात आल्या आहेत. या वॉर्डात एका ज्येष्ठ नागरिकावर उपचार सुरू होते. करोनाचा संसर्ग झाल्याने श्वास घेण्यास अडचण येत असल्याने दोन दिवसांपासून ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. रविवारी ऑक्सिजन सिलिंडर संपला. मात्र, तो बदलणारे कर्मचारी जागेवर नव्हते. त्याला शोधण्यात बराच काळ गेला. या काळात सर्वच रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे एका ज्येष्ठ रुग्णाला त्रास होऊन त्याचा मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तक्रार केल्यानंतर आलेले कर्मचारी सिलिंडर बदलत असल्याचेही चित्रिकरण करण्यात आले आहे. रुग्णालयात ऑक्सिजनची टंचाई नाही, पुरेसे सिलिंडर उपलब्ध आहेत. मात्र, सिलिंडर वेळेत बदलण्यात न आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. वाचा: यासंबंधी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा म्हणाले की, ‘रुग्णालयात आवश्यक ती साधनसामुग्री आहे. रुग्णांवर योग्य ते उपचार केले जातात. करोना बाधितांचे मृत्यू होत असले तरी ऑक्सिजन नसल्याने कोणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली नाही. या प्रकरणात नातेवाईकांची तक्रार आहे, तर त्याची चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा आढळून आला तर योग्य ती कारवाई केली जाईल.’ रुग्णाच्या नातेवाईकाने केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. एका बाजूला खासगी रुग्णालयात येणारे भरमसाठ बिल आणि दुसरीकडे सरकारी रुग्णालयातील अनास्था यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. वाचा:
from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
0 Comments: