महाराष्ट्राला कमी लसीचा पुरवठा; राजेश टोपेंनी आकडेवारीच दाखवली
मुंबईः केंद्र सरकारने राज्याला एका आठवड्यासाठी साडे सात लाख लसींचा पुरवठा केला आहे. तर, इतर राज्यांच्या तुलनेनं महाराष्ट्राला कमी लसीचा पुरवठा केला आहे,' असं राज्याचे आरोग्यमंत्री यांनी म्हटलं आहे. तसंच, लशीच्या पुरवठ्याच्या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे. 'राज्याला एका आठवड्यासाठी केंद्रानं फक्त साडे सात लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचं वाटप झालं आहे. ही आकडेवारीचा तक्ता आल्यानंतर मी तातडीने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्ती करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही ही दुरुस्ती होण्याची वाट पाहात आहोत,' असं टोपे यांनी म्हटलं आहे. 'राज्यातील रुग्णांची आकडेवारी देऊनही मिळणाऱ्या लसींचं प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४. ५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३० लाख असून अशा परिस्थितीत आम्हाला फक्त साडे सात लाख लशीचे डोस का?, असा सवाल राजेश टोपे यांनी केंद्राला केला आहे. राज्यात आठवड्याला ४० लाख आणि महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत. तरच, राज्यातील लसीकरण मोहिम व्यवस्थित सुरु राहिलं,' असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये ६ कोटी लोकसंख्या आहे, आपली लोकसंख्या १२ कोटी आहे. त्यांच्याकडे आत्तापर्यंत १ कोटी डोस दिले, आपल्याला १ कोटी ४ लाख डोस दिले. गुजरातमध्ये १७ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आपल्याकडे ४.५ लाख आहेत. मृतांचा आकडा देखील आपल्याकडे खूप जास्त आहे. जिथे जास्त गरज आहे, तिथे अधिक लक्ष द्यावं ही मागणी आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 'महाराष्ट्राची कामगिरी चांगली नाही म्हणून कोरोना वाढतोय हे सांगितलं जातंय हे चुकीचं आहे. महाराष्ट्राकडे दीड दिवसाचा लसीचा साठा आहे. अनेक जिल्ह्यात लसीकरण ठप्प होते हे चुकीचं आहे. राज्याला १५ एप्रिलनंतर मिळणारा साडे सात लाखाचा लसींचा स्टॉक वाढवून १७ लाख दिले आहेत. मात्र, हा साठाही महाराष्ट्रासाठी अपुराच आहे. असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. १८ ते ४५ हा वयोगट कामासाठी जास्त फिरणारा वयोगट आहे. त्यामुळं त्यांना जास्त संक्रमणाची भीती आहे. त्यामुळं या वयोगटातील लोकांना लस देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: