महाराष्ट्रात करोना लशीचा तुटवडा; फडणवीसांनी दिला 'हा' सल्ला
मुंबईः राज्यात ३ दिवस पुरेल इतकाच करोनावरील लसीचा साठा शिल्लक असून महाराष्ट्राला वेळेत लसीचा पुरवठा न झाल्यास तीन दिवसांत लसीकरण मोहिम बंद पडण्याची शक्यता आहे, अशी भीती आरोग्यमंत्री यांनी व्यक्त केली आहे. राजेश टोपे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील मंत्र्यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा थेट केंद्रासोबत बोललं पाहिजे, असा सल्ला दिला आहे. 'राज्य सरकार करत असलेला लसीकरणाबाबतचा आरोप चुकीचा आहे. मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा आपल्याकडे नियमित होत असतो. लसींचा देशभरात पुरवठा होत आहे. देशात सर्वाधिक लशी महाराष्ट्राला मिळाल्या आहे. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. आपल्याला लसींची साठेबाजी करायची नाही,' असा टोला यांनी लगावला आहे. तसंच, 'लसीच्या पुरवठ्याबाबत माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा केंद्र सरकारसोबत चर्चा का करत नाहीत. आपलं कुणी जाऊन दिल्लीत किंवा पुरवठादारांकडे जाऊन का बसत नाही. फक्त मीडियात बोलायचं आणि हात झटकायचे हे बंद व्हायला हवं. गांभीर्य यायला हवं. प्रत्येक वेळी विरोधकांना म्हणायचं राजकारण करू नका आणि मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं हे योग्य नाही,' असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 'राज्यात रेमडेसिवीरबाबत तात्काळ कारवाई करायला हवी. इंजेक्शनचा काळाबाजार रोखला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारने कडक निर्बंधांऐवजी सातही दिवस पूर्ण लॉकडाऊन केल्याचं चित्र आहे. सरकारने यावर चर्चा करुन मार्ग काढावा,' अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: