बीडः एकाच सरणावर ८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
बीडः राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दैनंदिन रुग्णवाढीचे आकडे आता ५० हजारांहून अधिक वाढत आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात एक भयाण वास्तवाची जाणीव करुन देणारी एक घटना घडली आहे. करोनामुळं दगावलेल्या ८ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्यात आला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्याकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, अजूनही करोनाचा संसर्ग रोखण्यास शासनाला यश येत नसल्याचं चित्र आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे काल करोनामुळं १० रुग्णांचा मृत्यू झाला होता. यापैकी सात रुग्ण हे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील असून एक रुग्ण सावरगाव कोविड सेंटरमधील आहे. करोनामुळं मृत्यू झालेल्या या ८ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची वेळ अंबाजोगाई नगरपालिकेवर आली आहे. नगरपालिकेच्या पथकानं एकाच रुग्णवाहिकेतून हे आठही मृत्यदेह स्मशानभूमीत आणले. त्यानंतर एकाच सरणावर आठ मृतदेह ठेवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांच्या दोन नातेवाईकांना येवेळ पीपीई कीट घालून उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. मृतांमध्ये १ महिलेचा समावेश असून इतर रुग्ण ६० वर्षांपुढील आहेत. राज्यात करोनाचा उद्रेक राज्यात करोना संसर्गाचा कहर कायम असून आज पुन्हा एकदा रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. राज्यात मंगळवारी करोनाचे ५५ हजार ४६९ नवीन रुग्ण आढळले आहेत तर त्याचवेळी २९७ रुग्ण दगावल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: