मोठा निर्णय! नागपूर झेडपीतील OBC जागांवरील निवडणूक रद्द
नागपूर: नागपूरसह राज्यातील पाच जिल्हा परिषदांमधील निवडणुकीसाठीचे आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाले होते. त्यामुळे तेथील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) जागांवरील निवडणुका रद्द करून तेथे नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेत. त्यानुसार, नागपूर जिल्हा परिषदेतील ५८ पैकी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या १६ जागांवरील निवडणुका रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिले. नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या १६ पैकी ४ जागा अतिरिक्त ठरल्या होत्या. त्यामुळे आता निवडणुका १६ जागांवर होणार की केवळ अतिरिक्त ठरलेल्या चार जागांवर होणार याबाबत कालपर्यंत जिल्हा परिषदेत संभ्रमाचे वातावरण होते. परंतु, शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलेल्या सर्वच जागांवरील निवडणुका रद्द करण्याचे आदेश काढले. त्यामुळे आता नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांवर फेरनिवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोगाने काढलेल्या पत्रानुसार, या जागा ४ मार्चपासून रिक्त झाल्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सदस्यांना ९ मार्चपर्यंत हे आदेश बजावून १० मार्चपर्यंत यासंबंधीचा अहवाल आयोगापुढे सादर करणे अपेक्षित आहे. पद गेले सध्याचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांचा केळवद सर्कल, भाजपचे गटनेते आणि जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांचा गुमथळा सर्कल आणि राष्ट्रवादीचे गटनेते शेखर कोल्हे यांचा पारडसिंगा सर्कलसुद्धा याच प्रवर्गात मोडतो. त्यामुळे या तिघांचेही सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांची पदेही गेलीत. काँग्रेसला मोठा फटका रद्द करण्यात आलेल्या १६ सर्कलपैकी सात सर्कलमध्ये काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत. याखेरीज राष्ट्रवादी आणि भाजपच्या प्रत्येकी चार तर शेकापच्या एकुलत्या एक सदस्याची निवडणूक रद्द ठरली आहे. आव्हान देणार अनेक सदस्य या निर्णयाला आव्हान देणारी पूनर्विचार याचिका दाखल करण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी कायदे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे सुरू आहे. तसेच राज्य सरकारसुद्धा पूनर्विचार याचिका दाखल करण्याच्या विचारात असल्याचे कळते. ह्यांच्या निवडणुका रद्द सावरगाव: देवका बोडखे (राष्ट्रवादी) भिष्णूर: पूनम जोध (राष्ट्रवादी) येवना: समीर उमप (शेकाप) पारडसिंगा: शेखर कोल्हे (राष्ट्रवादी) वाकोडी:ज्योती शिरसागर (काँग्रेस) केळवद:मनोहर कुंभारे (काँग्रेस) करंभाड: अर्चना भोयर (काँग्रेस) बोथिया पालोरा: कैलाश राऊत (काँग्रेस) अरोली-कोदामेंढी: योगेश देशमुख (काँग्रेस) गुमथळा: अनिल निधान (भाजप) वडोदा:अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस) गोधनी (रेल्वे): ज्योती राऊत (काँग्रेस) निलडोह: राजेंद्र हरडे (भाजप) डिगडोह:सुचिता ठाकरे (राष्ट्रवादी) इसासनी:अर्चना गिरी (भाजप) राजोला: भोजराज ठवकर (भाजप)
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: