रेखा जरे हत्या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती
म. टा. प्रतिनिधी, नगर: येथील सामाजिक कार्यकर्त्या खून खटल्यात सरकारची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाने ही नियुक्ती केली आहे. यादव यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यातील गाजलेल्या कोपर्डी येथील अत्याचार व खून खटल्यात सरकारी वकील म्हणून उच्च न्यायालयात काम पाहिले. याशिवाय नगर जिल्ह्यातील खुनाच्या अन्य खटल्यांचे कामकाजही त्यांनी पाहिले आहे. गेल्यावर्षी ३० नोव्हेंबरला जरे यांची जातेगाव घाटात हत्या झाली. सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. यामध्ये पोलिसांनी पाच आरोपींना अटक करून त्यांच्याविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, यातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे अद्याप फरार आहे. बोठे याच्या अटकेसाठी आणि या खटल्यात विशेष सरकारी वकील नियुक्तीच्या मागणीसाठी जरे कुटुंबियांनी आंदोलने केली होती. सुरवातीला यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांचे नाव पुढे आले होते. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ते मागे पडले. आता सरकारने यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी यादव यांच्या नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या खटल्याचे दोषारोपपत्र दाखल झाले असले तरी मुख्य आरोपी फरार असल्याने खटल्याचे प्रत्यक्ष कामकाज रखडण्याची शक्यता आहे. फरारी आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी पोलिसांना अद्याप यामध्ये यश आलेले नाही. मात्र, आरोपीला कायदेशीररित्या फरार घोषित करून मालमत्ता जप्तीच्या कारवाईच्या अगदी जवळ येऊन ठेपण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अजित पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आतापर्यंत जिल्हा न्यायालयात झालेल्या कामकाजात पोलिसांतर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी बाजू मांडली आहे. प्रसिद्ध फौजदारी वकील यादव-पाटील यांनी नगर जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण खटल्यात काम पाहिले असून काही खटले अद्याप सुरू आहेत. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरण, कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरण, पाथर्डी तालुक्यतील जवखेडे येथील तिहेरी हत्याकांड, जामखेडमधील दुहेरी खून प्रकरण अशा गाजलेल्या आणि महत्वपूर्ण खटल्यांचा सामवेश आहे. याशिवाय राज्यात अन्य खटल्यांतही यादव-पाटील विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत.
from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
0 Comments: