'या' बाबतीत ठाण्याने पुण्याला पुन्हा मागे टाकले!

March 10, 2021 0 Comments

श्रीकांत सावंत/प्रशांत मोरे : दरडोई उत्पन्नात सलग आठ वर्षे मुंबईनंतर दुसरा क्रमांक मिळवून ठाणे जिल्ह्याने राज्याची आर्थिक उपराजधानी हे स्थान कायम राखले आहे. त्याचबरोबर मुंबईसह कोकणाने संपूर्ण राज्यात दरडोई उत्पन्नात आघाडी घेतल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील आर्थिक उलाढालीचे एक प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे साहजिकच दरडोई उत्पन्नात मुंबईचा पहिला क्रमांक असतो. मात्र त्यापाठोपाठ गेली काही वर्षे पुण्याला मागे सारत पालघरसह ठाणे जिल्ह्याने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान राखले आहे. दरडोई उत्पन्नात ठाण्याने पुण्याबरोबरच नाशिक, नागपूर या राज्यातील इतर महानगरांनाही मागे टाकले आहे. राज्याच्या २०२०-२१च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार २०१९-२० या आर्थिक वर्षात मुंबई शहराचे ३ लाख ४४ हजार १४१ रुपये, तर ठाण्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ९१ हजार ८३६ इतके आहे. पुण्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ७९ हजार ७७७, नागपूरचे २ लाख ३८ हजार ९५५ आणि कोल्हापूरचे २ लाख ४ हजार ८२१ लाख इतके आहे. २०१०-११ पर्यंत दरडोई उत्पन्नामध्ये मुंबईपाठोपाठ पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर मात्र ठाण्याने दुसरा क्रमांकावर झेप घेतली. ती गेली आठ वर्षे कायम आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले असले तरी आर्थिक सर्वेक्षण अहवालात ठाणे-पालघर एकत्रितरित्या विचारात घेतले जातात. मुंबईलगत असलेल्या या दोन्ही जिल्ह्यांतील शहरी भाग उपनगरी रेल्वेसेवेने मुंबईला जोडलेला आहे. राज्यातील सर्वाधिक सात महापालिका या दोन जिल्ह्यांत आहेत. ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार या महापालिकांबरोबरच अंबरनाथ आणि बदलापूर ही वेगाने विकसीत होत असलेली शहरे जिल्ह्यात आहेत. मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, अंबरनाथ, वाडा-कुडूस, वासिंद आदी औद्योगिक वसाहतींमध्ये लाखो जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. या व्यतिरिक्त बांधकाम, सेवा क्षेत्र, कृषी, शेतीपूरक व्यवसाय, मत्स्यपालन, पशूपालन, फळबागा लागवडीचे क्षेत्र झपाट्याने विस्तारीत आहे. या क्षेत्रातील वाढत्या उलाढालीमुळे ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये ग्रामीण आणि आदिवासी भाग मोठा असूनही दरडोई उत्पन्नात मात्र ठाणे अव्वल राहिले आहे. कोकण विभाग अव्वल राज्यात मुंबईसह कोकण विभाग दरडोई उत्पन्नामध्ये ३ लाख ७९९ रुपयांसह पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई शहर आणि उपनगर ३ लाख ४४ हजार १४१, ठाणे-पालघर २ लाख ९१ हजार ८३६, रायगड २ लाख २९ हजार ४०७, सिंधुदुर्ग १ लाख ९४ हजार ९३३ तर रत्नागिरी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न १ लाख ७८ हजार ६६९ रुपये इतके आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागाने सरासरी २ लाख २४ हजार २४४ रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. नागपूर विभाग १ लाख ७९ हजार ४६४ रुपये दरडोई उत्पन्नासह राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. नाशिक विभाग १ लाख ५५ हजार ९९५ रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह चौथ्या क्रमांकावर आहे. औरंगाबाद १ लाख ३१ हजार ३२८, तर अमरावती १ लाख १५ हजार ७५२ रुपयांच्या दरडोई उत्पन्नासह राज्यात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: