धक्कादायक! करोनाकाळात विद्यार्थ्यांची सफर निघाली दुबईला

March 10, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईसह राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने अद्याप शाळांसह कॉलेजेही सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतानाच, बोरिवलीतील आदित्य कॉलेजने आपल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक भेटीसाठी (इंडस्ट्रियल व्हिजिट) थेट दुबईला नेण्याचा घाट घातला आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केलेली असतानादेखील, कॉलेजने दुबई प्रवासाचा हट्ट कायम ठेवला आहे. ऐन करोनाच्या काळात हा दुबई प्रवास होऊ नये, अशी विद्यार्थी व पालकांची मागणी कॉलेजने फेटाळून लावल्याने संताप व्यक्त होत आहे. बोरिवली येथील आदित्य कॉलेज ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कॉलेजने नियमित शुल्क आकारणी केली. या शुल्कात औद्योगिक भेटींसाठीचे शुल्कही विद्यार्थ्यांनी भरले आहे. यंदा करोनामुळे कॉलेज ऑनलाइन सुरू आहे. अशावेळी औद्योगिक भेटींचे आयोजन शक्य होणार नाही. यामुळे काही विद्यार्थ्यांनी कॉलेजकडून या संदर्भातील घेतलेले शुल्क परत मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी कॉलेजने दुबई येथे या भेटीचे आयोजन केले. याला काही विद्यार्थ्यांनी विरोध केला. यानंतर कॉलेजने या विद्यार्थ्यांना दुबईला यायचे नसेल, तर एक विशिष्ट ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट घातली. यालाही विद्यार्थ्यांनी विरोध केला. मात्र यानंतरही कॉलेजने पालकांकडून संमतीपत्रे घेतली आणि काही विद्यार्थ्यांनी पासपोर्ट जमा केले. अशा विद्यार्थ्यांची पहिली तुकडी १८ मार्चला, तर दुसरी तुकडी २१ मार्चला दुबईला रवाना होईल, असे सांगण्यात आले. तसेच याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी १० मार्च रोजी दुपारी ऑनलाइन सत्राचे आयोजन करण्यात आल्याचे ईमेलही पाठवण्यात आले. या करोनाकाळात आम्हाला परदेशात जायचे नाही, याबाबत आम्ही कॉलेजला कळवले, तरी त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व्यक्त करत आहेत. पुढे ढकलण्याची मागणी सध्या करोनाचा संसर्ग वाढत असल्याने ही भेट पुढे ढकलावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली होती. मात्र या मागणीला केराची टोपली दाखवून कॉलेजने ८ मार्च आणि २१ मार्च अशा दोन टप्प्यात हे भेटीचे नियोजन केल्याची बाब मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी समोर आणली. याबाबत त्यांनी कॉलेजला भेट देऊन विद्यार्थी व पालकांच्या म्हणण्याचा विचार करावा, असेही सांगितले. दरम्यान, यासंदर्भात कॉलेजमधील संबंधित विभागाचे प्रमुख मनोज भाटीया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: