करोनाचे नियम धुडकावत रंगला जंगी लग्न सोहळा, पोलीस येताच....

March 12, 2021 0 Comments

म. टा. वृत्तसेवा कल्याण : हद्दीत मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, शासनाकडून आखून दिलेल्या नियमाची पायमल्ली सुरूच आहे. कल्याण पूर्वेत नियमाची पायमल्ली करत बुधवारी संध्याकाळी ७०० लोकांच्या उपस्थितीत रंगलेल्या जंगी विवाह सोहळ्याच्या आयोजकांविरोधात पालिका प्रशासनाच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षी करोनाचा कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पहिला रुग्ण सापडल्यानंतर डोंबिवलीत रंगलेल्या शाही विवाह सोहळ्याला तुर्कीवरून आलेल्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या अनेकांना करोनाची लागण झाली होती. यानंतर वर्षभर हा परिसर हॉटस्पॉटच राहिला होता. याच लग्नातून संसर्ग झालेल्याचा मृत्यू हा परिससरातील पहिला करोनामृत्यू ठरला होता. यानंतर पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतरही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालिका प्रशासनाला १३० कोटीचा खर्च करत प्रचंड मनुष्यबळाची मेहनत घ्यावी लागली होती. अनलोक काळात लग्नसमारंभाना परवानगी देऊन केवळ ५० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. ऑक्टोबरनंतर काही प्रमाणात करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने काहीशी शिथिलता देण्यात आली असली तरी लग्न समारंभात मात्र ५० लोकांनाच परवानगी होती. आता पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही दिखाऊपणा करताना नागरिकांना नियमांचा विसर पडत आहे. कल्याण पूर्वेतील ६० फुटी रस्त्यालगत असलेल्या गॅस कंपनीशेजारी करण्यात आलेल्या शाही विवाह सोहळ्यात तब्बल ७०० नागरिकांनी उपस्थिती लावली होती. याची माहिती मिळताच ड प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांच्या पथकाने पाहणी केली असता यात तथ्य आढळल्याने या विवाह सोहळ्याचे आयोजकांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ५१, तसेच कोविड-१९ उपाययोजना नियम ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून नागरिकांनी वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: