ठाण्यातील 'या' १६ भागात आजपासून कडक लॉकडाऊन
ठाणेः राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक अधिक वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या १० हजारांच्या घरात पोहोचली आहे. मुंबई, ठाणे परिसरातही करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्रशासनाने निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे शहरातील काही भाग हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले असून या भागातील करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी आदेश काढला आहे. राज्यात करोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून काही जिल्ह्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. तर, काही जिल्ह्यात अशंतः लॉकडाऊन करण्यात आला असून मुंबईही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. ठाण्यातही करोनाचा प्रसार अधिक असलेल्या भागात कडल लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. करोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेनं १६ हॉटस्पॉट क्षेत्र जाहीर केले आहेत. या हॉटस्पॉट क्षेत्रात आजपासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या हॉटस्पॉट क्षेत्रांव्यतिरिक्त अन्य क्षेत्रात मिशिन बिगीन अगेननुसार इतर सेवा सुरु राहतील. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात सोमवारी ६१० नवीन करोना रुग्णांची वाढ झाल्यानंतर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २ लाख ७० हजार ४५५ वर गेली आहे. यापैकी २ लाख ५६ हजार ८६९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ७ हजार २८० इतकी आहे. तर दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण करोनाबळींचा आकडा ६ हजार ३०६ वर पोहचला आहे. दरम्यान, सोमवारी ठाणे शहरात १४९, कल्याण-डोंबिवली १९८, नवी मुंबई १०९, मिरा-भाईंदर ५६, उल्हासनगर १८, भिवंडी ११, अंबरनाथ २१, बदलापूर ३५, ठाणे ग्रामीण १३ रुग्णांची वाढ झाली आहे. या भागांमध्ये असेल लॉकडाउन १) आई नगर, कळवा २) सूर्या नगर, विटावा ३) खरेगाव हेल्थ सेंटर ४) चेंदणी कोळीवाडा ५) श्रीनगर ६) हिरानंदानी इस्टेट ७) लोढा माजीवाडा ८) रुणवाल गार्डन सिटी, बालकुम ९) लोढा अमारा १०) शिवाजी नगर ११) दोस्ती विहार १२) हिरानंदानी मिडोज १३) पाटील वाडी १४) रुणवाल प्लाझा, कोरेस नक्षत्र, कोरेस टॉवर १५) रुणवाल नगर, कोलबाद १६) रुस्तोमजी, वृंदावन स्टॉप
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: