लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर रक्तदान करावे; 'हे' आहे कारण
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर करावे, त्यापूर्वी रक्तदान करू नये, असे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने सूचित केले आहे. लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे दिसून येतात. या कारणास्तव हे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक देशामध्ये देण्यात येणाऱ्या लसींचा गुणधर्म हा करोना संसर्गाला प्रतिबंध करणारा असला तरीही लसीतील प्रतिबंध करणाऱ्या विषाणूची सक्रियता वेगवेगळी असते. त्यामुळे काही देशांत रक्तदान करण्याचा कालावधी हा १४ तर काही ठिकाणी तो २८ दिवसांचा निश्चित करण्यात आला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते २८ दिवसांनंतर रक्तदान करणे योग्य आहे. कारण लस घेतल्यानंतर शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होत असते. अॅण्टीबॉडीज तयार होत असताना रक्तदान करणे कितपत सुरक्षित आहे, यावरही वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरे आहेत. डॉ. राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की, लस घेणाऱ्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची लस दिली जात आहे याची अनेकदा कल्पना नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची लस घेणाऱ्या व्यक्तींसाठी हा कालावधी समान असायला हवा. रक्ताच्या दराची पुनर्रचना करण्याच्या मागणीवरही राष्ट्रीय संक्रमण परिषदेने विचार करावा, अशी मागणी वेगवेगळ्या राज्यांतील संबधित यंत्रणांकडून करण्यात आली आहे. मागील सात वर्षांमध्ये रक्ताच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. रक्तपेढ्यांमध्ये वापरण्यात येणारी सामुग्री तसेच प्रक्रिया शुल्कांवर अतिरिक्त दरवाढ झालेली आहे. रुग्णांना भुर्दंड पडणार नाही अशा प्रकारे दरवाढ व्हावी, असे मत राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेसोबत झालेल्या बैठकीमध्ये संबंधित तज्ज्ञांनी व्यक्त केले. हे कारण... - प्रत्येक देशांतील लसीतील प्रतिबंध करणाऱ्या विषाणूची सक्रियता वेगवेगळी - रक्तदान करण्याचा कालावधी हा १४ तर काही ठिकाणी २८ दिवस - वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते २८ दिवसांनंतर रक्तदान करणे योग्य - या कालावधीनंतर शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होत असते
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: