नाशिकमध्ये 'वीकेण्ड' लॉकडाऊन; इतर दिवशी सातच्या आत घरात
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक मोठी वाढ होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे जीवनावश्यक वस्तू वगळता शहर आणि जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक आस्थापना सकाळी ७ ते सायंकाळी ७ याच वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. सायंकाळी सातच्या आत घरात जाण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी केले. मंगळवारी (दि. ९) रात्री १२ वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार असून, या बंदी काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. () वाचा: मुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड आढावा बैठक घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाने रात्री पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलिस आयुक्त दीपक पांडेय, विशेष पोलिस निरीक्षक प्रताप दिघावकर, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी मांढरे म्हणाले, 'जिल्ह्यात पुन्हा करोनाबाधितांची संख्या उसळी घेऊ लागली आहे. महिनाभरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली आहे. करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी यापूर्वीच जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही करोना संसर्ग वाढ रोखणे आव्हान ठरले आहे. मास्क वापरासह, गर्दी टाळणे व सुरक्षित अंतरासारख्या नियमांचे नागरिक गांभीर्याने पालन करीत नसल्याने निर्बंध अधिक कठोर करण्याच्या निर्णयावर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे संचारबंदीबाबतचे निर्बंध अधिक कठोर करण्यात येत आहेत. सायंकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळून अन्य सर्व आस्थापना बंद ठेवाव्या लागणार आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ७ सर्व व्यावसायिक आस्थापना सुरू ठेवता येणार असून, हॉटेल्स, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. परंतु, त्यानंतर कटाक्षाने या आस्थापना बंद कराव्या लागणार आहेत. याशिवाय सुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मांढरे यांनी दिला आहे. रुग्णांसाठी इशारा करोनाबाधित अनेक रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने, या रुग्णांनी घराबाहेर पडू नये. बाधित व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळल्यास किंवा तशी तक्रार नागरिकांकडून आल्यास संबंधित व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. - औद्योगिक वसाहतींची निर्बंधातून सुटका - प्रवाशी वाहतूक सुरूच राहणार, जिल्हाबंदी नाही - किराणा दुकानदार, दूध विक्रेते, पेपर विक्रेते, भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी निर्बंध काहीसे शिथिल - नाशिक, मालेगाव, नांदगाव, निफाड तालुक्यांतील सर्व शाळा अनिश्चित काळासाठी बंद - दहावी, बारावीचे वर्ग पालकांच्या संमतीनुसार - क्लासेस अनिश्चित काळासाठी बंद - जीवनावश्यक सोडून इतर सर्व व्यवसाय सकाळी ७ ते रात्री ७ पर्यंत - १५ मार्चनंतरच्या विवाह समारंभाना परवानगी नाही. खासगी जागेत अत्यल्प उपस्थितीत विवाहाला परवानगी - बार, हॉटेल्स सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत - जिम, व्यायामशाळा, फिटनेस सेंटर फक्त व्यक्तिगत वापरासाठी - धार्मिक स्थळे सकाळी ७ ते सायंकाळी ७ खुले राहतील. शनिवार, रविवारी पूर्ण बंद - गर्दी जमणाऱ्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी - भाजीबाजाराला ५० टक्के क्षमतेने परवानगी - सर्व आठवडे बाजार बंद वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: