नक्षल्यांनी दिला थेट सी-६० कमांडोना इशारा; झळकावले बॅनर
गडचिरोली: जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे नक्षली बॅनर आढळून आले असून या बॅनरच्या माध्यमातून सी-६० जवानांना इशारा देण्यात आला आहे. आलपल्ली हे अहेरी उप विभागातील मुख्य शहर असून या शहरालगत सिरोंचा रस्त्यावर नक्षली बॅनर आढळून आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. रस्त्याच्या बाजूला बांधण्यात आलेल्या बॅनरमध्ये यावेळी नक्षल्यांनी थेट सी-६० कमांडोना टार्गेट केले असून यामध्ये त्यांनी चेतावनी दिली आहे. या बॅनरवर सी-६० को चेतावनी असा सुरुवातीला उल्लेख करून झुठा सर्च अभियान चलाकर आदिवासीयों के जल जंगल जमीन पर आदिवासींके खेत और मकानो को जलाना बंद करो! खुदकी झुठी प्रशंसा करके जनता की आंखो मे धुल झोकना बंद करो! वरना इसका अंजाम भुगतना होगा! असा मजकूर हिंदी मध्ये लिहिल्याचे आढळून आले. खाली भाकप माओवादी अहेरी असे लिहिले होते. बॅनर च्या बाजूला नक्षली पत्रक सुद्धा आढळून आले. याच महिन्यात नुकतेच अबुझमाड च्या जंगलात सी-६० जवानांना नक्षल्यांचा शस्त्र निर्मितीचा कारखाना उध्वस्त करण्यात यश मिळालं होतं. त्यानंतर सिरोंचा तालुक्यात नक्षल्यांनी रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे असून ते बोगस काम बंद करण्याबाबत इशारादेणारे बॅनर लावले होते. त्यानंतर आज पहाटे वॉकिंगला जाणाऱ्यांना आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावर नक्षली बॅनर आढळून आले. सध्या जिल्ह्याच्या दक्षिण भागात नक्षल्यांचा बॅनर बाजी सुरू असून त्यात विविध प्रकारे चेतावणी देण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. एकंदरीत अल्लापल्ली सारख्या शहराचा लगतच नक्षल्यांचे बॅनर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. असे असतानाही तब्बल २२ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याची बातमी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी काल २३ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. गेल्या दोन वर्षात आजपर्यंत एकूण ३७ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्याने हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले हे विशेष.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: