Mumbai crime: धावत्या लोकलमध्ये महिलेवर हल्ला; तिने प्रतिकार केला पण...
मुंबई/वसई: धावत्या लोकलमधील महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलेवर हल्ला करून तिच्याकडील सोन्याची चेन खेचून चोरट्याने पळ काढल्याची धक्कादायक घटना मुंबईजवळील येथे घडली. रेल्वे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. वसई ते नायगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या हल्ल्यात महिला जबर जखमी झाली असून, तिच्या डोक्याला टाके पडले आहेत. वसईत राहणारी २९ वर्षीय महिला सुट्टी असल्याने मैत्रिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडली होती. संध्याकाळी ७.४० वाजता ती वसई रेल्वे स्थानकाच्या फलाट १ वरून अंधेरी धिम्या लोकलमध्ये द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यात बसली. दरवाजामागेच असलेल्या सीटवर ती बसली होती. लोकल सुरू होताच त्या डब्यात एक जण चढला आणि त्याने तिच्याजवळील फोन खेचण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने महिला घाबरली. त्याने तिच्या डोक्यावर आणि तोंडावर कसल्या तरी जड वस्तूने एकापाठोपाठ एक प्रहार केले. तिने तरीही प्रतिकार केला. त्याने महिलेला धरून ठेवली. त्याने तिच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचण्याचा प्रयत्न केला. ती तुटून खाली पडली. त्याने ती लगेच उचलली आणि नायगाव रेल्वे स्थानकात उडी मारून तो पसार झाला. महिलेच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. जखमी अवस्थेतच ती नायगाव रेल्वे स्थानकात उतरली. तिच्या डोक्याला झालेल्या जखमेतून रक्तस्राव होत होता. ती रुग्णालयात गेली. तिच्या डोक्याला टाके पडले आहेत. तिने ही घटना पालकांना सांगितली. त्यानंतर वसई रेल्वे पोलिसांत रविवारी तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. वसई रेल्वे स्थानकातील फलाटावर एक व्यक्ती संशयास्पदरित्या दिसून आली असून, महिला डब्यात कुणाचा तरी शोध घेत असल्याचे दिसते. महिलेवर हल्ला करणारी आणि लूटमार करणारी व्यक्ती तीच असावी, असा संशय आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: