ट्वीट करण्यासाठी सेलिब्रिटींवर दबाव?; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
मुंबईः शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहानानं ट्विट केल्यानंतर देशात राजकारण रंगलं आहे. रिहानाच्या ट्विटनंतर एकाच वेळी भारतातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर, विरोधकांनी कलाकारांच्या ट्विटमागे केंद्र सरकारचा दबाव असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आंदोलनाबाबत कलाकारांनी केलेल्या ट्विटनंतर आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेस शिष्टमंडळाची झूम मिटिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक पार पाडली. यावेळी काँग्रेसचे नेते यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युतरामागे भाजपने त्यांना प्रवृत्त केले होते का? व भाजपाचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. वाचाः या प्रकरणात भाजपचं कनेक्शन आहे का याची चौकशी करण्याची मागणी सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. त्यावर देशमुख यांनी या कलाकारांवर दबाव आहे का, एकाच प्रकारची ट्विट करण्यात सगळ्यांना जबरदस्ती केली आहे का? याची आम्ही चौकशी करु, असं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर, राज्याचं गुप्तेहर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी देशमुख यांनी अभिनेता अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करत या दोन्ही ट्वीटमध्ये इतकी समानता असणं आश्चर्यकारक आहे, असंही म्हटलं आहे. वाचाः सचिन सावंत काय म्हणाले? 'कोणी व्यक्तीगत पातळीवरती आपले मत व्यक्त करत असेल तर त्या व्यक्तीचा तो संवैधानिक अधिकार आहे त्यावर आक्षेप घेण्याचे कारण नाही परंतु जर दबावाखाली त्यांच्याकडून हे करवून घेतले गेले असेल तर त्याचा निश्चितपणे विरोध होणे गरजेचे आहे. या दबावाच्या शंकेबद्दल पुष्टी करणारी माहिती या ट्विटचे विश्लेषण केल्यानंतर समोर येते. बहुतांश ट्विटमध्ये amicable हा शब्द सारखा येतो. त्यातही अक्षयकुमार आणि सायना नेहवाल यांचे ट्विट सयामी जुळ्या व्यक्तीने केल्याप्रमाणे शब्द न शब्द समान आहेत. यातूनच भाजपाने त्यांच्याकडून स्क्रिप्ट देऊन हे ट्विट करवून घेतले या शंकेला बळ मिळते. दुसरीकडे अभिनेता सुनिल शेट्टी यांनी केलेल्या ट्विटमध्ये मुंबई भाजपाचा उपाध्यक्ष हितेश जैन या व्यक्तीला उल्लेखीत करण्यात आलेले आहे. यातून भाजपाचे कनेक्शन होते का याची चौकशी करण्याची गरज निर्माण होते,' अशी शंका सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. वाचाः 'कृत्रिमरित्या जनमत तयार करण्यासाठी भाजपा असा दबाव आणते का, याची चौकशी होण्याची गरज आहे आणि कनपट्टीवर शस्त्र ठेवण्याची मानसिकता असणारे मोदी सरकार आहे याची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याच्या अधिकाराचे निर्वहन कोणत्याही दबावाशिवाय करता यावे असे वातावरण निर्माण करणे हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे कर्तव्य आहे आणि त्याचकरिता हे सरकार स्थापन झाले आहे म्हणूनच भाजपाच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे. तसेच गरज भासल्यास या सेलिब्रिटींना मोदी सरकारपासून संरक्षण व मानसिक आधार द्यावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: