सरकारी वकील पत्नीसह बाहेर गेले होते; परतल्यानंतर बंगल्यातील दृश्य बघून हादरले
म. टा. प्रतिनिधी, नगर: जिल्हा न्यायालयात कार्यरत अतिरिक्त सरकारी वकील गोरक्ष मुसळे यांचा बंगला भरदिवसा फोडून चोरट्यांनी ५० तोळे सोने चोरून नेले. वकील मुसळे पत्नीसह काही तासांसाठी बाहेर गेले होते. तेथून परत येईपर्यंत चोरट्यांनी डाव साधला. नगर-पुणे महामार्गावरील कायनेटीक चौकातील रविश कॉलनीमध्ये मुसळे यांचा बंगला आहे. त्यांच्या पत्नीच्या मैत्रीणीचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी मुसळे दाम्पत्य रविवारी दुपारी बाहेर गेले होते. जाताना त्यांनी बंगल्याची चावी मोलकरणीकडे दिली होती. मोलकरीण नेहमीप्रमाणे दोनच्या सुमारास तेथे आली. तासभर घरकाम करून कुलूप लावून ती निघून गेली. सायंकाळी सहाच्या सुमारास मुसळे परतले. त्यावेळी गेटचे कुलूप लावलेले होते. मात्र, बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडत नव्हते. त्यामुळे मुसळे यांना संशय आला. त्यांनी पाहणी केली असता कुलुपासोबत छेडछाड झाल्याचे आढळून आले. याशिवाय बंगल्याचा मागील बाजूचा दरवाजा तुटलेला आढळून आला. यावरून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना बोलाविले. चोरट्यांनी मागील दार तोडून आत प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले. बेडरुममधील कपाटातून सुमारे ५० तोळे सोन्याचे दागिने चोरांनी लंपास केले. बांगड्या, सोनसाखळी, ब्रेसलेट, मोहनमाळ, कानातील झुबे, नथ, मंगळसूत्र, नेकलेस, राणीहार चोरीला गेले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र, ते हाती लागले नाहीत. भरववस्तीत असलेला बंगला दिवसा फोडण्याचे धाडस चोरट्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नदीच्या बाजूला असलेल्या या कॉलनीत रात्रीच्या सुमारास घडफोडीचे प्रकार घडतात.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: