संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत शिवसेनेत मतभेद
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मृत्यूप्रकरणी वनमंत्री यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असून, पक्षाची प्रतिमा वाचविण्यासाठी राठोड यांनी राजीनामा द्यावा, यासाठी शिवसेनेतील एक गट आग्रही आहे. तर, धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली नसताना आपल्या मंत्र्यावर कारवाई कशाला, असा सवाल दुसऱ्या गटाकडून केला जात आहे. दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत माहिती नसल्याची प्रतिक्रिया नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर काही 'ऑडिओ क्लिप' समाजमाध्यमावर व्हायरल झाल्या असून, त्यावरून विरोधी पक्ष भाजपने शिवसेना; तसेच राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राठोड यांच्या राजीनाम्याबाबत भाजप आग्रही असताना शिवसेनेतील एका गटानेही विनाकारण होणारी पक्षाची बदनामी थांबविण्यासाठी राठोड यांचा राजीनामा घेतला जावा, अशी भूमिका मांडली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून, नंतर जे काही सत्य बाहेर येईल त्यानुसार राठोड यांच्यावर कारवाई अथवा त्यांना पुन्हा मंत्रिपदावर नेमता येईल, असे या गटाचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे पक्षातील अन्य गटाने राठोड यांचा राजीनामा घेण्याच्या भूमिकेला विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही काही आरोप झाले होते, मात्र त्यांचा लगेचच राजीनामा घेण्यात आला नाही. त्यामुळे आपल्या मंत्र्यांचा तरी कशाला राजीनामा घ्यायचा? पोलिस तपासात जे काही सत्य बाहेर येईल त्यानुसार नंतर कारवाई करता येईल, असे या गटाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या गटाचे नेतृत्व पक्षातील एक ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्रीच करीत आहेत. दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. राठोड यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फिरत होत्या. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. संजय राठोड हे प्रकरण सरकारशी संबंधित आहे, सरकारचे प्रमुख लोक त्या विषयाशी संबंधात निर्णय घेतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवसेनेत दोन गट वैगेरे काही नाही, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे. पक्षाच्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले की, शिवसेना आमदार, खासदार यांची नियमित बैठक असून त्यात मतदारसंघाचे प्रश्न, संघटनात्मक बांधणी सोडून बाकी इतर विषय नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: