वीज बिलांबाबत महावितरणचे एक पाऊल मागे; दिली 'ही' माहिती
म. टा. प्रतिनिधी, नगरः पश्चिम महाराष्ट्रात करोना काळातील वीज बिल वसुलीसाठी थेट कनेक्शन तोडण्याचा इशारा कंपनीने दिला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटू लागल्याने कंपनीने मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून येते. नगर जिल्ह्यात ३३ कोटी रुपयांची अशी थकबाकी असली तरी या ग्राहकांना वीज तोडण्याचा इशारा न देता केवळ बिल भरण्याची विनंती करण्याची भूमिका कंपनीने घेतली आहे. भरणा सुलभ व्हावा, यासाठी थबबाकीचे हप्ते पाडून देण्याची योजानाही सुरू आहे. करोना काळात म्हणजे एप्रिल २०२० पासून वीज बिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे १४ लाख ग्राहकांनी थकबाकीचा भरणा न केल्यास नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्याचे निर्देश कंपनीच्या पुणे विभागीय संचालकांनी दिले होते. यावरून ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली असून विरोधी पक्षांनी आंदोलनेही केली. त्यामुळे आता सरकार आणि कंपनीने नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून येते. नगर जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत एकदाही वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांची संख्या ५९ हजार आहे. त्यांच्याकडे सुमारे ३३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या वसुलीसाठी महावितरण कंपनी त्यांना थेट नोटिसा आणि वीज तोडण्याचा इशारा न देता बिल भरण्याबाबत विनंती करण्याचे ठरविले आहे. अर्थात थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्याची अधिकाऱ्यांची तयारी आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने याबाबत थोडे सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे महावितरणने या थकबाकीदारांना वीज बिल तातडीने भरून महावितरणसमोर निर्माण झालेली आर्थिक अडचण दूर करण्याची विनंती केली आहे. वाचाः कंपनीकडून ग्राहकांसमोर वस्तुस्थिती मांडून सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे की, वीज कंपनीने एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या दहा महिन्याच्या काळात थकीत वीजबिलापोटी कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. राज्यातील ४१ लाख ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२ हजार ग्राहकांनी एकही वीज बिल भरले नाही. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ५९ हजार ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ३३ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला मोठया आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागत असून विजेच्या वाहतुकीवरही मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे यापुढे महावितरणला ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. वाचाः महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेवून ग्राहकांनी आपल्या थकीत वीजबिलांचा भरणा करावा. वसुलीचे प्रमाण कमी असल्याने दरमहा वीजखरेदी, कंत्राटदारांची देणी, कर्जांचे हप्ते, आस्थापना खर्च, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च भागवणे अशक्य होत आहे. परिणामी येत्या काही दिवसात या थकबाकीमुळे वीजपुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची व अडचणी येण्याची शक्यता आहे, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. वाचाः घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर (कृषी वगळून) सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकीत व चालू वीजबिलांच्या रकमेचा भरणा करण्यासाठी हप्त्यांची सोय उपलब्ध झाली आहे. या योजनेमध्ये वीजपुरवठा सुरु असलेल्या ग्राहकांसोबतच तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेले, वीजचोरी किंवा न्यायप्रविष्ट प्रकरणातील वीजग्राहकांना सहभागी होता येईल. केवळ दोन टक्के रक्कम भरून या योजनेत सहभागी होता येणार आहे. ग्राहकांना उपविभाग कार्यालयांमध्ये अर्ज करून या योजनेत सहभागी होता येणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: