मुंबई: मालकाशी वाद; ड्रायव्हरनं ३ कोटींच्या ५ बस दिल्या पेटवून
मुंबई: ट्रॅव्हल एजन्सीत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या मुंबईतील व्यक्तीने जवळपास ३ कोटी रुपये किंमतीच्या पाच बस पेटवून दिल्या. मालकाने पैसे दिले नाहीत म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे समजते. पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली. एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अजय सारस्वत असे २४ वर्षीय ड्रायव्हरचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या पाच बस एका महिन्याच्या कालावधीत पेटवून दिल्या. पहिली घटना २४ डिसेंबर २०२० रोजी झाली होती. त्यावेळी तीन बस पेटवून दिल्या होत्या. त्यानंतर २१ जानेवारी २०२१ रोजी आणखी दोन बस पेटवून दिल्या. त्यामुळे केवळ आत्माराम ट्रॅव्हल एजन्सीच्या बस का पेटवल्या जात आहेत, असा संशय पोलिसांना आला. बसमध्ये बॅटरींच्या दुरुस्तीचे काम निघाले होते. त्यामुळे आगी लागल्याचे कारण सांगितले जात होते. मात्र, महिनाभराच्या कालावधीत पाच बस पेटल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्याचवेळी एजन्सीच्या मालकाने आपल्या एका कर्मचाऱ्यावर संशय घेतला. मालक आणि ड्रायव्हर यांच्यात पगारावरून वाद झाला होता. करोना काळात एजन्सीला ड्रायव्हरची गरज होती. गोव्यात अजय बस चालवत होता. त्यावेळी अपघात झाला होता. यात मोठे नुकसान झाले होते. ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाने अजयचे काही पैसे दिले नव्हते. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. पोलिसांनी अजयला पोलीस ठाण्यात बोलावले आणि त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सुरुवातीला बसचे पडदे पेटवत होतो. त्यामुळे संपूर्ण बस पेट घ्यायची, असे अजयने पोलिसांना सांगितले. एजन्सीच्या मालकाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे अजयने सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: