राजा आला! देवगड हापूस आंबा मुंबईत दाखल

January 07, 2021 0 Comments

म. टा. वृत्तसेवा, सर्वाना प्रतीक्षा लागून असलेल्या कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामातील पहिल्या मुहूर्ताच्या बाजारात बुधवारी दाखल झाल्या आहेत. हापूस आंब्याच्या हंगामाला सुरूवात झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभर करोनाच्या संकटामुळे मरगळ आलेल्या बाजाराला या वर्षी तरी हापूस आंब्याच्या हंगामामुळे उभारी मिळेल अशी आशा या निमिताने बाजार समितीतील व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. देवगडमधील कुणकेश्वर येथील शेतकरी शंकर नाणेरकर यांनी हापूस आंब्याच्या दोन पेट्या फळ बाजारातील व्यापारी अविनाश पानसरे यांना पाठवल्या आहेत. हंगामातील पहिला आंबा हा मुहूर्ताचा आंबा मानला जातो. त्यामुळे या आंब्याची विधिवत पूजा करून पूर्ण हंगाम चांगला जाऊ दे अशी प्रार्थनाही केली जाते. अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या व्यापाऱ्यांनीही जपली आहे. त्यामुळे बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीची पूजा करण्यात आली. आत्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हापूस बाजारात दाखल झाला आहे. मात्र कोकणातील हापूसचा मुख्य हंगाम सुरू व्हायला अजून उशीर आहे. तसेही यावर्षी आंब्याचे उत्पादन कमीच राहणार असल्याचे चित्र आहे. वादळात झाडांचे झालेले मोठे नुकसान, त्यात आत्ता पडत असलेली कडक थंडी यामुळे आंब्याचा मोहोर गळून पडत आहे. त्यामुळे मुहूर्ताचा आंबा बाजारात आला असला तरी हापूसचा मुख्य हंगाम सुरू व्हायला उशीर लागणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हापूस आंब्याचा खरा हंगाम सुरू होईल अशी माहिती व्यापारी अविनाश पानसरे यांनी दिली आहे. या वर्षी आंबा उशिराच येणार आहे आणि त्यातच दरवर्षीच्या मानाने या आंब्याचे सरासरी उत्पादन देखील कमीच असणार आहे हे स्पष्ट आहे. हजार-दीड हजार दर हा मुहूर्ताचा आंबा असल्याने या आंब्याचे दर ठरवण्यात आले नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र मुख्य हंगाम सुरू होईपर्यंत अधूनमधून बाजारात अशाप्रकारे दोन-चार पेट्या आंबा बाजारात येत असतो आणि या आंब्याला हजार ते दीड हजार रुपये डझन असा दर मिळत असतो.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: