'हॉटेल, पब, बारमध्येही गर्दी असते, मग लोकल ट्रेनवरच बंधने का?'
म. टा. प्रतिनिधी, करोनाकाळात बंद असलेल्या शाळा, महाविद्यालय, आयटीआय यासारख्या शैक्षणिक संस्था आता हळूहळू सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. मुंबई लोकलच्या सुमारे ९० टक्के लोकल फेऱ्या सुरू आहेत. यामुळे शिक्षण घेण्यासाठी तरी किमान विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात करोना लसीकरण सुरू झाले आहे. आता गर्दीचे कारण पुढे करत सर्वसामान्य प्रवाशांवर लादण्यात आलेली लोकलबंदी हटवण्यात यावी. मुंबईतील हॉटेल, बार, पब, डिस्को हे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. या नाइट लाइफसाठी तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावर कोणतेही बंधने नाहीत. मात्र शाळकरी विद्यार्थी, अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकलमुभा नसल्याने मोठ्या त्रासातून जावे लागत आहे. प्रवासखर्चाचा भुर्दंड कसारा-कर्जत भागांतील वाहतुकीच्या सुविधांची कमतरता आणि त्यांना लागणारा खर्च आता परवडेनेसा झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना लोकलमुभा देऊन त्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी कल्याण- रेल्वे पॅसेंजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: