‘रत्नदीप’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे; मुदतीत कारवाई न केल्यास आंदोलन: आ.लंके

March 20, 2024 0 Comments

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील रत्नदीप फाउंडेनच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन शुक्रवारी (दि.15) स्थगित करण्यात आले. यासंदर्भात तीनही विद्यापीठांनी मुदतीत कारवाई न केल्यास नगर येथे मोठे आंदोलन करण्याचा इशारा आमदार नीलेश लंके यांनी दिला.

रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्याविरोधात विद्यार्थी व शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांचे अकरा दिवसांपासून उपोषण सुरू होते. त्यांची शुक्रवारी आमदार नीलेश लंके यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाअध्यक्ष सुनील साळवे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, राजेंद्र कोठारी, रमेश आजबे, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टाफरे, हवा सरनोबत, शहाजी राळेभात, सनी सदाफुले, पवन राळेभात, डॉ. भरत दारकुंडे, सचिन देशमुख, प्रशांत राळेभात, विजय राळेभात, भाऊ पोटफोडे, भाऊ म्हेत्रे, गणेश जोशी, आकाश घागरे, राजेंद्र गोरे प्रफुल सोळंकी, शुभम हजारे उपस्थित होते.


नाशिकच्या आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू कानेटकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थी व विद्यार्थिनींशी संवाद साधला. अन्यायाबाबत गंभीर दखल घेऊ, तसेच विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज भरून घेतले जातील, असे आश्वासन देत महाविद्यालय बंद करण्याबाबत शासनाला अहवाल पाठविण्यात येईल. विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यासाठी शासनाकडे मागणी करू, असेही ते म्हणाले. यावेळी पुणे विद्यापीठाचे डॉ. प्रमोद पाटील, गणेश दामा, डॉ. नीरज व्यवहारे, डॉ. सुनील अमृतकर, किरण भिसे व अविनाश फलके उपस्थित होते.


प्रा.फलके म्हणाले, विद्यापीठाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरून घेणे, जवळचे परीक्षा सेंटर मिळण्याबाबत पाठपुरावा केला जाईल. राज्य तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या ज्योत्स्ना बुधगावकर, सचिन जाधव यांनीही विद्यार्थींच्या भावना जाणून घेतल्या. रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यासाठी अहवाल देण्याची ग्वाही दिली. यावेळी तहसीलदार गणेश माळी म्हणाले, विद्यार्थ्यांच्या बहुसंख्य मागण्या विद्यापीठ स्तरावर मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घ्यावे. जेणे करून त्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल.


पंधरा सदस्यीय उच्च समिती देणार अहवाल




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील 15 सदस्यीय उच्च समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून 15 दिवसांत शासनास अहवाल सादर करणार आहे.


निवास व जेवणाची व्यवस्था पूर्ववत करू




विद्यार्थ्यांची निवास व जेवणाची व्यवस्था पूर्ववत सुरु राहण्यासाठी तालुका प्रशासन आपल्या पाठीशी ठाम राहील. याबाबत कोणताही अडथळा आल्यास पोलिसांमार्फत कारवाई करण्यात येईल. निवेदनातील सर्व मुद्यांवर सकारात्मक कार्यवाही झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेे.


..तर पुन्हा आंदोलन : पांडुरंग भोसले




‘रत्नदीप’च्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांपैकी काही मागण्या मान्य झाल्या असून, काही प्रलंबित आहेत. मागण्या पूर्ण झाल्या नाही,तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले यांनी दिला.


मोरे वनविभागाच्या ताब्यात




रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष भास्कर मोरे याला वनविभागाने हरीण पाळल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वनविभागाने 10 मार्चला रत्नदीप मेडिकल फाउंडेशन परिसरात तपासणी केली असता, एक जखमी हरीण आढळले होते. त्यानंतर मोरे विरोधात वन्य जीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. तसेच, हरीण मारून पुरल्याची तक्रार आल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने अनेक ठिकाणी खोदून शोध घेण्यात आला. यावेळी काही प्राण्यांचे केस व एक हाड आढळून आले होते. ते तपासणीसाठी नागपूर येथे फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहे. तसेच, 13 मार्चला काही प्राण्यांचे शिंग आढळून आले असून, त्याची तपासणी सुरू आहे.


हेही वाचा



* ‘जलजीवन’च्या कामांनी गाठली निकृष्टतेची पातळी !

* धक्कादायक ! प्रेमात अडथळा ठरला; पतीसोबत तिने केले असे काही

* जळगाव : जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळावरील उपाययोजनेचे काम प्रगतीपथावर 






The post ‘रत्नदीप’च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे; मुदतीत कारवाई न केल्यास आंदोलन: आ.लंके appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T4LB29

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: