आमदार नीलेश लंके यांची घरवापसी?; शरद पवारांची भेट

March 12, 2024 0 Comments

नगर ः पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी (11 मार्च) शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगर दक्षिण लोकसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव या भेटीत लंके यांनी शरद पवार यांच्यासमोर ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नगर दक्षिणेत आता भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात आ. लंके असा राजकीय संघर्ष पाहावयास मिळण्याचे संकेत मिळत आहेत.


राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनेक दिवस आ. लंके तळ्यात-मळ्यात होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत राहायचे की अजित पवारांसोबत जायचे, अशा द्विधा मनःस्थितीत असलेले लंके महिनाभरानंतर अजित पवारांसोबत गेले. मात्र त्यानंतरही त्यांच्या बॅनरवर शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची छायाचित्रे कायम दिसून आली. अगदी 10 मार्चला वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरही शरद पवार यांचे फोटो पाहावयास मिळाले. अजित पवार सत्तेत सामील होत महायुतीत गेल्यानंतरही आ. लंके नगरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करतच राहिले. इतकेच नव्हे तर भाजपचे खा. विखे यांच्यावर राजकीय शरसंधानही साधत राहिले. भाजपचे आमदार राम शिंदे, भाजप नेते विवेक कोल्हे यांनीही आमदार लंके यांची पाठराखण केली. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपच्या कोट्यात असून डॉ. सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत.


तासभर शरद पवारांशी चर्चा




विखेंविरोधात मोर्चेबांधणी करणार्‍या आ. लंके यांना उमेदवारी मिळणार का, न मिळाल्यास ते कोणता निर्णय घेणार, याकडे नगरसह राज्याचे लक्ष लागून असतानाच आ. लंके सोमवारी शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. मोदी बागेतील निवासस्थानी आ. लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे तासभर चालेल्या या बैठकीनंतर आ. लंके तेथून बाहेर पडले आणि खा. अमोल कोल्हे यांच्या भेटीला पोेहोचले. आ. लंके यांची भेट झाल्याचे खा. कोल्हे यांनी मान्य केले. दरम्यान, शरद पवार यांनी लंके यांच्या भेटीचा व चर्चेचा इन्कार केला आहे. मात्र शरद पवार – आ. नीलेश लंके यांची भेट झाल्याचे पुरावे ‘पुढारी न्यूज’ने समोर आणले आहेत. आता आ. नीलेश लंके हे आगामी काळात काय भूमिका घेतात, याकडे नगरसह राज्याचे लक्ष लागून आहे.


काही गोष्टी घडण्यापूर्वीच बोलणे अयोग्य ः लंके




शरद पवारांच्या भेटीचा आ. नीलेश लंके यांनी स्पष्टपणे इन्कार केला आहे. नगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राजकारण कुठं टर्न करील सांगता येत नाही. काही गोष्टी घडण्यापूर्वी त्यावर काही बोलणे योग्य नाही. महायुती, जागावाटप हा वरिष्ठ स्तरावरचा विषय असून मी शेवटचा घटक आहे. त्यामुळे त्या विषयावर बोलणे योग्य नाही. प्रवेशाबाबत मी काही विचार केला नाही. मी भेटलोच नाही, विनाकारण चर्चा सुरू आहे, असे आ. लंके म्हणाले.


The post आमदार नीलेश लंके यांची घरवापसी?; शरद पवारांची भेट appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T3xtyc

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: