मुले सांभाळत नाहीत ; साठीनंतर मोडली हक्काची काठी!

February 08, 2024 0 Comments

गोरक्ष शेजूळ







नगर : पुढारी वृत्तसेवा : आयुष्यभर काबाडकष्ट केले, घरदार उभे केले, मुलांना शिकवले, मुलींची लग्न केली; मात्र ऐन वयाच्या साठीनंतर आपल्याच घरातून आपल्याच मुलांनी बेदखल केल्याचे अनेक प्रकार पुढे येत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या अशा तक्रारींवर सुनावणी घेऊन, ‘त्या’ मुलांना थोडा कायद्याचा धाक दाखवून, तर कुठं डोळ्यात सामाजिक अंजन घातले गेले. त्यामुळे अशा हताश 40 हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे या समितीचे अध्यक्ष आहे. सचिव म्हणून समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांचाही यात समावेश आहे. सामाजिक न्याय विभागाकडे ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीं प्राप्त झाल्यानंतर संबंधित ज्येष्ठ नागरिक आणि ज्याच्या विरोधात तक्रार आहे तो मुलगा किंवा इतर यांना समोरासमोर घेऊन सुनावणी होते, त्यातून सत्यता पडताळून निकाल दिला जातो.


किती व कोणत्या तक्रारी?

जिल्ह्यात वर्षभरात 69 ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक न्यायभवनात आपले तक्रार अर्ज केले आहेत. यात बहुतांश तक्रारी ह्या- मुलं सांभाळत नाहीत, सुनांचा त्रास सहन करावा लागतो, मालमत्तेवरून वाद घालतात, घराबाहेर काढले जाते, औषधोपचाराला पैसे देत नाहीत, अशा प्रकारच्या आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक असल्याचा गैरफायदा घेऊन केले जाणारे जमिनीचे वाद, शेजार्‍याचा सातत्याने होणारा त्रास याचाही या तक्रारीत समावेश असल्याचे समजले आहे.


20 अर्जावर सुनावणी सुरू

सामाजिक न्याय भवनात आलेल्या 69 तक्रार अर्जापैकी 49 ज्येष्ठ नागरिकांना सुनावण्या घेऊन न्याय देण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. तर उर्वरित 20 अर्जांवर सुनावणी सुरू असून, त्याही लवकरच निकाली निघणार असल्याचे सांगितले जाते.


मोलकरणीने घरच गिळले!

एका तक्रारीत ज्येष्ठ नागरिकाची शेजारी शेजारी दोन घरं आहेत. त्यांनी आपल्या घरात मोलकरीणीला आश्रय दिला होता. मात्र काही दिवस ते ज्येष्ठ नागरिक परदेशात मुलाकडे गेले होते. तेथून ज्या वेळी ते परतले, त्या वेळी मोलकरणीने घरावरच कब्जा करताना घर खाली करण्यास नकार दिला. यावरही आता सुनावणी सुरू असल्याचे समजले.


जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांसाठी तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. या माध्यमातून तक्रारींचे निवारण केले जात आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा घेतली गेली, यातही त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. तसेच त्यांच्यासाठी हेल्पलाईनही सुरू केली आहे.

                      – राधाकिसन देवढे, सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग


पोलिस अधिकारी मुलाविरुद्ध तक्रार!

एका मातेचा मुलगा पोलिस अधिकारी आहे. मात्र तो औषधोपचारासाठी पैसे देत नसल्याची तक्रार प्राप्त असल्याचे सांगितले जाते. यावर सुनावणी होऊन मातेला पेन्शन असल्याने त्यावर तिचा उदरनिर्वाह होऊ शकतो, असा अभिप्राय देण्यात आल्याचे समजले.


The post मुले सांभाळत नाहीत ; साठीनंतर मोडली हक्काची काठी! appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2SnKk

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: