काहीजण शेवटची निवडणूक म्हणून साद घालतील; भुलू नका : अजित पवार

February 05, 2024 0 Comments

बारामती, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या निवडणुकीत काहीजण माझी ही शेवटची निवडणूक म्हणत तुम्हाला भावनिक साद घालतील. पण त्याला भुलू नका. माझ्याच विचाराचा खासदार बारामतीतून निवडून द्या. बारामती मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार कोणीही असू द्या, मीच उमेदवार आहे, असे समजून त्याला निवडून द्या, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्यावर रविवारी हल्लाबोल केला.


खासदारकीला इकडे मत द्या, आमदारकीला अजितला द्या, असे ते म्हणतील. पण मला दोन्ही ठिकाणी तुमची साथ गरजेची आहे. खासदारकीला मला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी स्वतःच वेगळा विचार करेन. कोणाच्या बापाचे ऐकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


ते नुसतेच माझी शेवटची निवडणूक म्हणतात. पण शेवटची निवडणूक केव्हा होईल हेच समजत नाही, असा टोलाही त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला. कोणी कितीही भावनिक करायचा प्रयत्न केला तरी भावनिक होऊ नका, असे आवाहन उपस्थितांना करत त्यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.


राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बारामती व्यापारी महासंघातर्फे आयोजित मेळाव्यातही त्यांनी असेच आवाहन केले.


इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचे (ज्येष्ठ नेते शरद पवार) ऐकत आलात. आता माझे ऐका, असे आवाहन करून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी बोलून मतदारसंघासाठी भरीव निधी आणू शकेन, असे आश्वासन दिले. आजवर मी राज्य सरकारकडून कामे करून घेत होतो. केंद्रातूनही बारामती मतदारसंघातील अन्य तालुक्यांसाठी निधी आणत विकास करणार आहे. आतापर्यंत आपल्या आजूबाजूलाही किती आमदार आणि खासदार होऊन गेले. पण आपल्या अडचणींवेळी कोण उपयोगी पडतेय याचाही विचार आपण करा, असे सांगत त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली.


तिकडचे अनेकजण भेटतात


काहीजण मला मुंबईत भेटले. आमची चूक झाली, दादा, तुमच्याशिवाय कुणी काम करू शकत नाही, असे ते सांगतात. पण काहींची अडचण मला समजू शकते, असेही अजित पवार म्हणाले.


खा. सुप्रिया सुळे यांना टोला


आपल्या विचारांचा खासदार असेल तर कामे झपाट्याने होतील. विकासकामे करणारा खासदार आपल्याला हवा आहे.फक्त इकडे तिकडे फिरणारा नको, या शब्दांत अजित पवार यांनी खा. सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टोला लगावला.


The post काहीजण शेवटची निवडणूक म्हणून साद घालतील; भुलू नका : अजित पवार appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T2K1rk

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: