सातबारा कोरा करण्याची हिंमत कोणातच नाही : आ. बच्चू कडू

January 31, 2024 0 Comments

श्रीरामपूर: पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याची कोणत्याही पक्षाची हिम्मत नाही. त्या फक्त निवडणुकात बोलायच्या गोष्टी आहेत. जसं काँग्रेस शेतकर्‍यांबरोबर वागली तसंच भाजपही वागत आहे. शेतमालाला निर्यात बंदी करून आयात खुली करायची आणि शेतमालाचे भाव पाडायचे, हीच यांची पद्धत असल्याचा घरचा आहेर महायुती सरकारला देतानाच या विरोधात शेतकर्‍यांचे एकमत होत नसल्याची खंत आ. बच्चू कडू यांनी व्यक्त केली. श्रीरामपूर येथे न्यायालयीन प्रकियेसाठी आलेले आ.कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, आप्पासाहेब ढुस, रुपेंद्र काळे, नवाज शेख, लक्ष्मण खडके, अ‍ॅड. पंढरीनाथ औताडे, दीपक पटारे उपस्थित होते.


आ. बच्चू कडू म्हणाले, जनतेचे प्रश्न सत्तेत असले म्हणजे मांडायचे नाहीत ही चुकीची प्रथा पाडली जात आहे. भाजपा बरोबर मी सत्तेत सहभागी होण्यासाठी गेलो नव्हतो. त्यांचेच मला फोन आले होते. त्यामुळे मी प्रश्न मांडतच राहणार. त्यांना पटत असेल तर मला सत्तेत ठेवावे अन्यथा दूर करावे. मला त्याचे काहीही वाटणार नाही. जाती धर्माच्या प्रश्नावर सर्व पक्षांचे वागणे वेगवेगळ्या प्रकारचे आहे. धर्म माणसाला जगायला शिकवतो परंतू पोटात अन्न असल्याशिवाय जगता येत नाही, हे कुठल्याच पक्षाला समजायला तयार नाही. धर्माचे झेंडे लोकांच्या हाती देऊन निवडणुका जिंकता येतील परंतु माणसांना जगवता येणार नाही. त्यासाठी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवावेच लागतील. शेतकर्‍यांनी केंद्र सरकारकडे शेतमालाला रास्त भाव मागितला तर सरकारने लोकांना फुकट धान्य योजना सुरू केली.


सगळा नुसताच उलटा धंदा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली. आमदार,जिल्हाधिकारी व प्राध्यापक यांचे पगार थोडे कमी करून अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांचे मानधन सरकारने वाढवले पाहिजे, असेही आ.कडू एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले. भाजप बरोबर सत्तेत सहभागी असलो म्हणजे शेतकर्‍यांचे, मजुरांचे व कष्टकर्‍यांचे प्रश्न मांडायचे नाहीत का?, त्यांनी मला सत्तेतून बाहेर काढले तरी त्याची पर्वा मी करत नाही.जे प्रश्न आणि दुःख आहे ते मी स्पष्टपणे मंडणारच अशी रोखठोक भूमिका आ.बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. मराठा आरक्षण प्रश्नावर आ. कडू म्हणाले, या प्रश्नावर 19 फेब्रुवारी (शिवजयंती) नंतर सविस्तरपणे भूमिका मांडू. आता त्यावर काहीच बोलणार नाही.


The post सातबारा कोरा करण्याची हिंमत कोणातच नाही : आ. बच्चू कडू appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T25GJ5

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: