अंधारासोबत तिने झेलले वखवखल्या नजरांचे डंख

December 29, 2023 0 Comments

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूर बसस्थानकावर रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान थांबलेल्या महाविद्यालयीन तरुणीला अंधारात थांबून बसची वाट पाहावी लागलीच; शिवाय त्या अंधारातही वासनेने वखवखलेल्या टोळक्यांच्या नजरांचे डंखही पचवावे लागले. त्यांतून स्वतःला सोडवत ती बसस्थानकाच्या बाहेर आली, तेव्हा काही तरुणांनी तिचे पालक येईपर्यंत तिला सोबत करत दिलासा दिला.

या प्रकारामुळे येथील एसटी बसस्थानकाच्या दुरवस्थेचा आणि रात्रीच्या वेळी बसस्थानक आवारात होणारा दारुडे आणि टवाळांच्या अड्ड्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


त्याचे असे झाले… नाशिकहून नेवाशाकडे जाणारी शेवटची बस रात्री बाभळेश्वरमध्ये बंद पडली. त्या बसमधील थोडेफार प्रवासी मिळेल त्या वाहनाने श्रीरामपूरपर्यंत रात्री नऊ-साडेनऊच्या आसपास आले. मात्र रात्री आठच्या नंतर श्रीरामपूर बसस्थानकातून एकही बस बाहेर जात नसल्याने आणि रात्री प्रवाशांना मार्गदर्शक सूचना देणारा एसटीचा एकही कर्मचारी तेथे नसल्याने एका महाविद्यालयीन तरुणीला काहीच उलगडा होईना. बसस्थानकात अंधार आणि शुकशुकाट. त्यातहीआपल्याला गावी जाण्यासाठी एखादी तरी बस मिळेल या भोळ्या आशेवर ती बसस्थानकात खूप वेळ बसून राहिली. तिची नजर बससाठी आसुसलेली, तर बसस्थानकात कोपर्‍यात बसलेल्या तळीरामांच्या आणि टवाळांच्या वखवखलेल्या नजरा तिच्यावर रोखलेल्या. थोड्या वेळाने या टवाळांनी मुलीच्या अवतीभवती चकरा मारायला सुरवात केली. त्यामुळे मुलगी भेदरली आणि बसस्थानकाच्या बाहेर येऊन उभी राहिली.


त्यादरम्यान श्याम घाडगे व रितेश खाबिया या येथील हिंदुत्ववादी संघटनेेच्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मुलीची विचारपूस केली आणि तिच्या पालकांशी संपर्क साधून तिला धीर देत शेजारच्याच एका हॉटेलमध्ये बसवून ठेवले. थोड्या वेळाने सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित मुथा, योगेश ओझा यांनीही तेथे येऊन मुलीला आधार दिला. चहा-नाश्ता दिला. रात्री उशिरा मुलीचे पालक मोटारसायकलवरून आले, तेव्हा ती आपल्या गावी रवाना झाली. तोपर्यंत कार्यकर्ते तिच्या सोबत राहिले.


या सर्व प्रकाराने मात्र एसटी महामंडळाला नागरिकांनी शिव्यांची लाखोली वाहिली. बस खराब झाल्यावर पर्यायी बसची व्यवस्था महामंडळाने करायलाच हवी; पण असे घडत नसल्याने सामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. त्यातच येतील बसस्थानकात ना उजेड ना रात्री माहिती देणारी व्यवस्था. या समस्यांकडे लक्ष वेधणार असल्याचे संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितले.


The post अंधारासोबत तिने झेलले वखवखल्या नजरांचे डंख appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0kBnV

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: