त्यांच्याही जीवनात फुलला जोडीदाराच्या सोबतीचा प्रकाश

December 27, 2023 0 Comments

राजेश गायकवाड







आश्वी : भांडी आणि फ्रीजपर्यंत मोठ्या हौसेने सजविलेले रुखवत, बँडच्या तालावर नाचणारे वर्‍हाडी आणि पारंपरिक उत्साहात लागलेले लग्न… असेच सर्वसाधारण चित्र असते तर कदाचित त्याकडे कोणाचे लक्षही गेले नसते. पण ते केवळ लग्न नव्हते, तो होता एक उत्सव. दोन अंधारलेली आयुष्य एकमेकांच्या साथीने प्रकाशमय करण्याचा उत्सव. त्यांना दृष्टीचे तेज भलेही नियतीने नाकारले असेल, पण आपल्या बुद्धिमत्तेच्या, प्रज्ञेच्या तेजाने डोळसांनाही मानवतेची दिशा दाखविणार्‍या दोन जीवांच्या नव्या जीवनारंभाचा उत्सव… दोन विभिन्न जातिधर्माच्या दृष्टिहीन वधू-वराच्या रेशीमगाठीचा उत्सव… म्हणूनच त्या सोहळ्यात हातांतील अक्षदा त्यांच्या डोक्यावर पडत होत्याच; शिवाय बहुतेकांच्या डोळ्यांतून आसवांचा अभिषेकही त्यावर होत होता.


नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंकुदा येथील तेजस्विनी आणि अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चास (नळी) येथील सागर दगू निकम या दृष्टिहीन जोडप्याचा हा विवाह सोहळा अनेक अर्थांनी आणि कारणांनीही लक्षवेधी ठरला. जातीधर्माच्या बेड्या तोडून आधुनिक मानवताधर्म जागविणार्‍या आणि एकमेकांच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी आयुष्यभराची साथ करण्याचे ठरविलेल्या या दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


नियतीने डोळ्यांनी हे जग पाहण्याचे सुख नाकारलेल्या आणि पितृसुखालाही पारखी झालेल्या तेजस्विनीचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण अंधशाळेत झाले. नंतर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून आता ती ‘एमपीएससी’ची तयारी करत आहे. सागर दगू निकम याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्रीरामपूर येथील अंध मुलामुलींच्या शाळेत आणि पुढे पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून ‘एमए’पर्यंत शिक्षण झाले. सध्या तो आयडीबीआय बँकेच्या कोपरगाव येथील शाखेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तोही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. कुटुंबीयांनी मोठ्या कष्टातून त्याला उभे केले आहे. या नवदाम्पत्याने अंधत्वावर मात करून उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय अधिकारी बनण्याची इच्छाशक्ती ठेवत आरंभलेले हे नवोन्मेषी सहजीवन आदर्श आणि इतरांनाही प्रेरणादायी ठरणार आहे


The post त्यांच्याही जीवनात फुलला जोडीदाराच्या सोबतीचा प्रकाश appeared first on पुढारी.


http://dlvr.it/T0dvZR

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: