Nagar : ‘थर्ड पार्टी रिपोर्ट’अभावी अडला पथदिव्यांचा उजेड

November 29, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : पथदिव्यांचे बिल मोठ्या प्रमाणात येत असल्याने स्मार्ट एलईडी योजना राबविण्यात आली. परंतु, या योजनेचा थर्ड पार्टी रिपोर्ट गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्याने ठेकेदाराने पथदिव्यांचे मेंटेनन्स व नवीन पथदिवे बसविणे थांबविले आहे. परिणामी अनेक ठिकाणी दिवे बंद असून, काही ठिकाणी दिव्यांचा पुरेसा प्रकाश पडत नाही, अशी चर्चा सुरू आहे. महापालिकेला केवळ पथदिव्यांसाठी महिन्याकाठी 40 लाख रुपयांचे बिल भरावे लागत होते. त्यासाठी महापालिकेने स्मार्ट एलईडी योजना राबवून त्याला पर्याय शोधला. स्मार्ट एलईडी बसविल्यानंतर महापालिकेच्या वीजबिलात कपात होईल, असा दावा संबंधित ठेकेदाराकडून करण्यात आला होता. महापालिका ठेकेदाराला पैसे देणार आणि ठेकेदार वीजबिल भरणार आहे.


त्यात मेंटेनन्स व बंद दिव्यांच्या जागी नवीन दिवे लावणे याची जबाबदारी ठेकेदारांची आहे. स्मार्ट एलईडी दिवे बसवून आता दोन वर्षे होत आली, त्यात सुरुवातीला करारामध्ये 25 हजार दिवे बसविण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर विविध भागांतील नगरसेवकांकडून मागणी वाढल्याने पुन्हा सहा हजार दिवे बसविण्यात आले. त्यामुळे शहरात आतापर्यंत 32 हजार स्मार्ट एलईडी बसविण्यात आले आहेत. मनपाला महिन्याला 40 लाख रुपये वीजबिल येत होते. ते आता 36 ते 35 लाखांवर आले आहे. त्यामुळे स्मार्ट एलईडीमुळे वीजबिलांमध्ये बचत होताना दिसत आहे. दुसरीकडे स्मार्ट एलईडीचा प्रकाश मात्र फारसा पडत नाही, अशी नगरसेवकांची ओरड आहेच. त्यात उर्वरित आणखी पाच ते सहा हजार दिवे बसविण्याची मागणी नगरसेवकांची आहे.


दरम्यान, स्मार्ट एलईडी पथदिव्यांची योजना सुरू झाल्यापासून अद्याप थर्ड पार्टी रिपोर्ट न झाल्याने संबंधित ठेकेदाराला महापालिकेकडून एकही रुपया मिळालेला नाही. त्यामुळे ठेकेदाराने आता स्मार्ट एलईडी दिव्यांचे मेंटेनन्स थांबविले आहे. तसेच, नवीन दिवे बसविण्यासही त्याचा नकार आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागात अंधार असून, नवीन पथदिवे बसविण्याची मागणी होत आहे. परंतु, बिलाअभावी स्मार्ट एलईडी दिव्यांचे मेंटेनन्स रखडले आहे. त्यात विद्युत विभागाकडून थर्ड पार्टी रिपोर्ट मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप थर्ड पार्टी रिपोर्ट मिळालेला नाही, असे सूत्रांकडून समजले.


The post Nagar : ‘थर्ड पार्टी रिपोर्ट’अभावी अडला पथदिव्यांचा उजेड appeared first on पुढारी.


http://dlvr.it/SzS9jd

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: