नगर : दुर्दैवी घटना; तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा मृत्यू

October 06, 2023 0 Comments

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथून भुमकडे जाणाऱ्या हैदराबाद राष्ट्रीय महामार्गा लगत व अंतरवाली शिवारात असलेल्या एका पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, एका वाटसरूच्या धाडसामुळे यातील मुलांच्या आईचा जीव वाचवण्यात यश आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खर्डा व परिसरावर शोककळा पसरली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. ५)दुपारी १: ०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दहावीत शिक्षण घेत असलेला कृष्ण परमेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे) व दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे) तर आठवीत शिक्षण घेत असलेली सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (वय १४ वर्षे) हे दोन सख्खे भाऊ-बहिण असे तिघे जण यामधे मयत झाले.


या घटनेत सुरूवातीला पाय घसरून पडल्याने मुलगी पाण्यात बुडू लागली. तीला वाचवण्यासाठी दोन्ही मुलं पाण्यात उतरली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तीही बुडू लागली. त्या तिघांना वाचवण्यासाठी यातील मुलांची आईही पाण्यात उतरली मात्र तीही बुडत असताना तीने आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणारे असून भुम तालुक्यातील गिरगाव येथील सरपंचांनी केलेल्या धाडसामुळे या मुलांना वाचवण्यासाठी पाण्यात जाऊन बुडू लागलेल्या महिलेचा जीव मात्र वाचला आहे. सदर दुर्घटना ग्रस्त कुटुंबातील मयत व्यक्तीचे सुतक काढण्यासाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या या परिवारासच सुतक पडले आहे.


तीनही मयत मुलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी केले असून अंत्य संस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आले तर खर्डा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आ. रोहित पवार यांनी दुर्घटना ग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.


या घटनेत खर्डा गावचे माजी उपसरपंच भागवत सुरवसे, श्रीकांत लोखंडे , ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलकरे, महालिंग कोरे , वैभव जमकावळे ,वडार समाज संघटनेचे अध्यक्ष बबलु सुरवसे, बबलू गोलेकर , गणेश ढगे , योगेश सुरवसे ,सुहास मदने, तेजस चावणे, योगेश वाळुंजकर ,सागर पवार, मंगेश देशमाने, जुनेद शिलेकर, लखन नन्नवरे, बिभीषण चौघुले, मयुर डोके, बाबासाहेब डोके, विशाल मुरकुटे यांची मोठी मदत झाली. खबर देणारे खर्डा येथील रहिवासी व दुर्घटना ग्रस्त मुलांचे नातेवाईक बिभीषण नामदेव चौघुले यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलीस स्टेशनला सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


या आकस्मात मृत्यूच्या आकस्मात नोंदी जामखेड पोलीसात दाखल करण्यात येऊन हा तपास झिरो नंबरने आंबी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जामखेड पोलीसांकडून मिळाली आहे.


The post नगर : दुर्दैवी घटना; तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन भावंडांचा मृत्यू appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Sx45rZ

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: