जामखेड : वीजबील अपडेट करण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची ५ लाखांची ऑनलाईन फसवणूक

October 02, 2023 0 Comments

जामखेड; पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील एका शेतकऱ्याला एका अनोळखी व्यक्तीने फोन करून महावितरण कार्यालयातून बोलत आहे, असे सांगत तुमचे वीजबिल सिस्टीममध्ये अपडेट झालेले नाही. ते करण्यासाठी मोबाईलमध्ये ‘क्विक सपोर्ट’ नावाचे ॲप डाऊनलोड करायला सांगत त्यांच्या मोबाईलचा अक्सेस घेत त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख ३४ हजारांची रक्कम काढून घेत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.


याबाबत भारत नारायण काकडे (वय ५९, रा. बोर्ले, ता. जामखेड) यांनी शुक्रवारी (दि. २९) नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फसवणुकीची ही घटना तीन महिन्यापुर्वी म्हणजे २ जून ते १२ जून या कालावधीत घडली आहे. फिर्यादी काकडे यांना अज्ञात व्यक्तीने त्याच्या ९८८३९७४६७९ या मोबाईल वरुन फोन करत आपण ‘महावितरण’ मधून बोलत आहोत आपले लाईट बील सिस्टींममध्ये अपडेट झालेले नाही, ते अपडेट करुन घेवू, असे सांगत भारत काकडे यांना क्विक सपोर्ट नावाचे ऑप मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला सांगितले. फिर्यादीने ते ॲप डाऊनलोड केल्यानंतर सदरील व्यक्तीने त्यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस घेत त्यांच्या


आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून ५ लाख ३४ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाईन काढून घेतली. यानंतर देखील काकडे यांच्या निदर्शनास ही बाब लवकर आली नाही. जेव्हा त्यांना आपली फसवणूक झाली आहे, असे समजले तेव्हा त्यांनी जामखेड पोलिसांशी संपर्क साधत माहिती दिली. मात्र फसवणूक झालेली रक्कम ५ लाखांपेक्षा जास्त असल्याने जामखेड पोलिसांनी त्यांना नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी (दि. २९) दुपारी नगरच्या सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं.वि.क. ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे हे करीत आहेत.


अलीकडच्या काळात आपण अनेक गोष्टींसाठी ऑनलाईन पेमेंट करण्याला प्राधान्य देतो. ऑनलाईन पेमेंट करणे सुलभ असले तरी सायबर गुन्हेगारांची कायमच अशा प्रकारच्या व्यवहारांवर नजर असते आणि ते विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करतात. आता वीज बिलाच्या नावाखाली सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करत असल्याच्या घटना घडत आहेत. सायबर भामट्यांनी आता महावितरणची ऑनलाइन बिले भरण्याच्या नावाखाली ग्राहकांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आपली फसवणूक टाळावी असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.


The post जामखेड : वीजबील अपडेट करण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची ५ लाखांची ऑनलाईन फसवणूक appeared first on पुढारी.


http://dlvr.it/Swsry6

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: