पावसाने अडविली खरिपाची वाट !

July 18, 2023 0 Comments

ज्ञानदेव गोरे :  वाळकी : नगर तालुक्याच्या दक्षिण भागात वळीव पावसाने तर मान्सून पावसाने आतापर्यंत हुलकावणी दिली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी दमदार पावसाची अजुनही शेतकर्‍यांना प्रतिक्षा आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले. दिवसभर वाहणारा वारा अन् आकाशात दिसणार्‍या पोकळ ढगामुळे शेतकरी हैराण आहे. पावसाने खरीपाची वाट अडविली असल्याने तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत. बळीराजा आता पुनर्वसु नक्षत्रातील पावसाच्या प्रतिक्षेत आहे. यंदाही पावसाची बंडखोरी कायम असल्याने खरीपाची वाट खडतर बनली आहे. नगर तालुक्यातील वाळकी, गुंडेगाव, राळेगण, देऊळगाव सिद्धी, वडगाव तांदळी, रुईछत्तीशी, गुणवडी, हातवळण, मढपिंप्री, दहिगाव, साकत, वाटेफळ, घोसपुरी, सारोळा कासार, अकोळनेर, भोरवाडी परिसरात पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांच्या बहुतांशी पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात 27 टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे; मात्र तालुक्याच्या उत्तर भागात जास्त झाल्याचे दिसते. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरणीही लांबणीवर गेली. काही ठिकाणी जुन महिन्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याने, पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकर्‍यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, उगवण झालेल्या पिकांची पावसाअभावी बिकट परिस्थिती बनली आहे. परिणामी या ठिकाणचे शेतकरी संकटात सापडले आहेत. दररोज केवळ ढग दाटून येत असले तरी पाऊस मात्र पडत नसल्याचे चित्र आहे. नगर तालुक्यातील वाळकी, गुंडेगाव, सारोळा कासार परिसरात पावसाच्या आशेवर शेतात पेरलेले उगवले.. मात्र उगवलेले पाण्याअभावी डोळ्यांदेखत करपू लागल्याचे चित्र दिसत आहे. निसर्गाच्या बेगडी प्रेमाने बळीराजाच्या मनावर चिंतेन घर बनवले..अशी बिकट अवस्था सध्या निर्माण झाली आहे. आकाशात दररोज निर्माण होणार्‍या काळ्या ढगांकडे बळीराजा चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने पावसाची वाट बघत आहे. यंदा समाधानकारक मान्सून बरसणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज खोटा ठरला आहे. खरिपाची पेरणी केलेले सोयाबीन, बाजरी, मूग, तूर, उडीद पिके शेताततून उगवत आहे. तर काही उगवले आहेत. ही पिके शेतकर्‍यांच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी करपत असल्याचे विदारक चित्र परिसरात आहे. दोन दिवसांत पावसाची कृपा झाली नाही तर तालुक्यातील दक्षिण भागातील हजारो हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. शेतकर्‍यांना नुकसानीच्या संकटाचा सामना करावा लागणार असून, शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दररोज सकाळी आकाशात ढगांची गर्दी होत असल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर समाधानाची लकीर दिसते. मात्र, संपूर्ण दिवसभरात रिमझिम तर सोडाच, पण पावसाचा एक थेंबही पडत नसल्यामुळे बळीराजा चिंतात आहे. दुसर्‍या दिवसाची वाट पहातो आहे. आता, खरीपाच्या पेरण्या होणार की, नाही असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट नगर तालुक्यात ठरावीक गावे वगळता अन्य ठिकाणी दमदार पाऊस पडलेला नाही. अल्प स्वरुपाच्या पावसावर खरीपाची पेरणी शेतकर्‍यांनी केली. पिकांची उगवण झाली; मात्र पावसाने दांडी मारल्याने या पिकांचे भवितव्य धोक्यात आले. दोन चार दिवसांत पावसाचे आगमण न झाल्यास उगवण झालेली पिके जळतील अशी भीती निर्माण झाली आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांसमोर उभे ठाकले. पावसा अभावी खरीपातील मूग, उडीद पेरणी वाया गेली. इतर पिकांच्या पेरण्याही खोळंबल्या असून, शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करून नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले. आता, 25 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस झाला तरच शेतकर्‍यांना बाजरी, तूर, मका व सोयाबीनची पेरणी करता येणार आहे.                                   -पोपटराव नवले, उपविभागीय कृषी अधिकारी, नगर    The post पावसाने अडविली खरिपाची वाट ! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SsNBbd

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: