पारनेर : चिकूच्या बागेत मटणाला ‘बहर’..!

November 28, 2022 0 Comments

https://ift.tt/9DeWLya

शशिकांत भालेकर : 

पारनेर : नगर-पुणे महामार्गावर चास-कामरगाव येथील शेतकर्‍यांनी आपल्या चिकूच्या बागेत चिकूचे उत्पन्न न घेता, थेट हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. चक्क चिकूच्या झाडाखाली खवय्यांची गर्दी होत असून, बागेत चिकूऐवजी मटणाला ‘बहर’ आल्याचे दिसून येत आहे. सर्व नियमांची पायमल्ली करत हा व्यवसाय महामार्गाच्या लगत राजरोसपणे सुरू असून, याकडे जिल्हा पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
खवय्ये आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. चास-कामरगाव घाटात चक्क चिकूच्या बागेत परिसरातील शेतकर्‍यांनी आपापल्या शेतात चुलीवरचे मटण, जत्रा रस्सा या नावाने जोरात व्यवसाय सुरू केलेला आहे.

येथे खवय्यांची मोठी तुडुंब गर्दी होत आहे. हे व्यावसायिक चुलीवरच्या मटणासोबत आपापल्या परीने मद्यपानाचीही व्यवस्था करतात. अनेक हौशी खवय्ये मद्य सोबत घेऊन येतात. तर, जे आणत नाहीत, त्यांची येथे व्यवस्था केली जाते. चिकूच्या झाडाखाली टेबल लावून मध्यप्रेमी राजरोसपणे या ठिकाणी मद्यप्राशन करतात. हॉटेल व्यवसायिक त्यांना पाणी, ग्लास अन् सोबत लागणारा चकणा पुरविण्याचे काम करतात. मात्र, अशा प्रकारे राजरोस बेकायदेशीरपणे या ठिकाणी दारू पिण्यास परवानगी कोणी दिली? बागेत असा व्यवसाय करण्यास परवाना आहे का? संबंधितांना प्रशासन पोलिस प्रशासनाचा अर्थपूर्ण पाठिंबा आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

या परिसरात चार ते पाच ठिकाणी बागेतच व्यवसाय थाटले असून, तेथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे. महामार्गाच्या कडेलाच मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने लागलेली असतात. या गर्दीवर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच, रस्ता ओलांडून येथे अपघात होण्याची देखील मोठी शक्यता आहे. मात्र, याकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अल्पावधीतच नॉनव्हेज जेवणासाठी या परिसराला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. साध्या पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात येथे जेवणाची व्यवस्था होते. मात्र, जेवणासोबतच दारूची व्यवस्था मद्यप्रेमींसाठी होत असून, याला कोणाचेही बंधन नाही हे विशेष! अनेक ठिकाणी महामार्ग ओलांडण्यासाठी दोन-दोन किलोमीटर दुभाजक नाही.
महामार्ग तोडून हॉटेलकडे येण्यासाठी रस्ता करण्यात आलेला असला तरी संबंधित विभागानेही याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.

मद्यप्रेमींमध्ये होतायेत वाद

परिसरातील बागांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. त्याचबरोबर हजारो वाहनांची वर्दळ येथे होत असते. त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे. अनेक वेळा मद्यप्रेमी वाद घालतात व त्याचे रूपांतर भांडणात होते. एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? तसेच या परिसरात अनेक ठिकाणी बालकामगारही मोठ्या प्रमाणात आहेत.

चिकूच्या आडोशाला मद्यावर डल्ला !

येथील शेतकरी आता ना चिकूचे उत्पन्न घेतात ना चिकूची विक्री करतात. बागेत हॉटेलच्या बेकायदेशीर व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपये मिळत असल्याने, चिकूऐवजी मटण अन् दारूलाच बहर आलेला आहे. येथे राजरोसपणे उघड्यावर मद्यप्रेमी आनंद घेताना दिसतात. दुसरीकडे हॉटेल व्यवसायिकही त्यांची सेवा करण्यात मग्न आहेत.

The post पारनेर : चिकूच्या बागेत मटणाला ‘बहर’..! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/XvV7G0q
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: