‘सिनेट’साठी नगरची मते निर्णायक ! नगरमध्ये आघाडीचा उमेदवारच नाही

November 14, 2022 0 Comments

https://ift.tt/MeLj4Ss
Election

नगर : पुणे, नगर आणि नाशिक कार्यक्षेत्र असलेल्या पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी महाविकास आघाडीप्रणित सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल विरोधात भाजपचे विद्यापीठ विकास मंच, असाच सामना रंगला आहे. मात्र, 26 हजार मतदार असलेल्या नगरमध्ये आघाडीच्या 9 आमदारांना एकही उमेदवार देता न आल्याने नगरकरांना आता पुणे आणि नाशिकच्या उमेदवारांना मतदान करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. भाजपाने मात्र नगर जिल्ह्यातून दोघांना उमेदवारी दिली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्य सार्वत्रिक निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. 22 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी 88 हजार मतदार आहेत. पुणे जिल्ह्यातून 46 हजार, नगरमधून 26 हजार आणि नाशिकमधून 16 हजार मतदार मतदानास पात्र आहेत. त्यात नगरची मते ही निर्णायक ठरणारी आहेत. राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेत विद्यापीठातील भाजपाची बेबंदशाही संपविण्यासाठी महाविकास आघाडी ही निवडणूक लढवित असल्याचे स्पष्ट केले आहे.

यावेळी प्रचारप्रमुख प्रशांत जगताप यांनीही मावळत्या सत्ताधार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. विद्यापीठाच्या 1200 कोटींच्या ठेवी असताना सदस्यांनी 200 कोटींच्या ठेवी मोडल्या आहेत. विद्यापीठाला सावित्रीबाई फुले नाव देतानाही संबंधितांनी विरोध केला. सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारतानाही त्यांची भूमिका काय होती, हे राज्याने पाहिले. शिपायांपासून लिपिकापर्यंतच्या भरतीत त्यांनीच हस्तक्षेप केला. बहुजनांच्या मुलांचे शैक्षणिक अधिकार हिरावले, असे अनेक आरोप केले.

दरम्यान, नगरचे मतदार विखेंना मतदान करणार नाहीत, ते आघाडीसोबत असल्याचे सांगत अंकुश काकडेंनी उमेदवारांचा उत्साह वाढविला खरा, मात्र नगरमध्ये एकही उमेदवार नसल्याचे सांगण्याची नामुष्की काकडे यांच्यावर ओढावली. जिल्ह्यात 26 हजार मतदार असताना आणि राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचे एक असे नऊ आमदार असतानाही त्यांना एकही पदवीधर उमेदवार देता येऊ नये, यापेक्षा दुर्दैव नसल्याचे आता मतदारच बोलू लागले आहेत.तिसर्‍या छत्रपती शाहू महाराज पॅनलने नगरमधून एक उमेदवार दिला आहे.

डॉ. राजेंद्र विखे बिनविरोध
भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचचे नेतृत्व डॉ. राजेंद्र विखे पाटील हे करत आहेत. संस्थाचालकांच्या गटातून डॉ. राजेंद्र विखे पाटील हे बिनविरोध निवडून आल्याचेही वृत्त आहे. आता जिल्ह्यातील मतदार संख्या पाहता सर्वाधिक शेवगाव-पाथर्डीत 16 हजार मते असल्याने तेथून युवराज नरवडे यांना उमेदवारी दिली आहे. लोणीतून सचिन गोर्डे यांना उमेदवारी देऊ केली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात जाऊन नगर आणि नाशिकचे मतदार मतदान करतील, असा विश्वास व्यक्त केल्याने उमेदवारांचे मनोबल वाढले आहे.

गतवेळी नगरमधून दोन विखे; आता मामा-भाचे?
गत निवडणुकीत सिनेटवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे पाटील आणि अनिल विखे हे दोघे सिनेटवर सदस्य म्हणून गेले होते. यावेळी विखेंचे नातेवाईक युवराज नरवडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी संस्था चालकांच्या गटातून डॉ. राजेंद्र विखे हे बिनविरोध आले आहेत. डॉ. राजेंद्र विखे व युवराज नरवडे हे मामा-भाचे आहेत.

नगरच्या 1500 मतदारांची नावे टाकलीत पुणे केंद्रात?
सिनेटसाठी पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यात मतदान केंद्र आहेत. मात्र, अंतिम मतदार यादीत प्रचंड गोंधळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. नगरच्या 1500 मतदारांची नावे जाणीवपूर्वक पुणे केंद्रावर टाकण्यात आली आहेत, तर नाशिकचीही 1200 मतदारांची नावे पुण्यात आहेत. या मतदारांना मतदानासाठी पुण्यातील केंद्र शोधावे लागणार असल्याने याबाबत कुलपतींकडे तक्रार केल्याचेही जगताप म्हणाले.

The post ‘सिनेट’साठी नगरची मते निर्णायक ! नगरमध्ये आघाडीचा उमेदवारच नाही appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/ld1ZyNn
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: