लम्पी रोखण्यासाठी गाव-तालुकास्तरावर समित्या
https://ift.tt/mHDPhVK
नगर : पुढारी वृत्तसेवा : दररोज लम्पी बाधित जनावरांची संख्या वाढती आहे, शिवाय दैनंदिन 50 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यूचे सत्रही थांबताना दिसत नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषद प्रशासनाने ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ उपक्रमाला गती देण्यासाठी ग्रामस्तरीय व तालुकास्तरीय समितीच्या नियुक्त्या सुरू केल्या आहेत. गावोगावी लम्पीदूतही नेमले जाणार आहेत. गावातील शेतकर्यांमध्ये गोठ्यात फॉगिंग, स्वच्छता, व अन्य लंपी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करण्यासाठी या समितीचे योगदान उपयुक्त ठरणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनात पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ.सुनील तुंबारे व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांनी लम्पी रोखण्यासाठी सातत्याने वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या आहेत. 100 टक्के लसीकरणही पूर्ण केलेले आहे. मात्र तरीही लम्पीचा कहर सुरूच आहे. त्यामुळे आता गावोगावच्या ग्रामपंचायती, सामाजिक संघटना, सहकारी संस्थांनी याकामी पुढे येवून शेतकर्यांमध्ये गोठा स्वच्छ ठेवून माशा, गोचीड, डास नष्ट करून लम्पीरोखण्यासाठी प्रशासनाने जनजागृतीची पाऊले उचलली आहेत.
गावोगावी लम्पीदूत नेमणार!
ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून गावातील गोठ्यांची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षण पथके तयार केली जाणार आहेत. पशुसंवर्धन अधिकारी, प्रगतशील शेतकरी आणि सरपंच यांच्या सल्ल्याने गावातील पशुपालकांनी माहिती व पशुपालनाही आवड असणारे दोन किंवा आवश्यक लोकसंख्येनुसार दोन पेक्षा अधिक स्वयंसेवकांची लम्पीदूत म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.
तालुकास्तरीय समितीचे तहसीलदार अध्यक्ष!
तहसीलदार हे तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.तर गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त पशुसंवर्धन,सहायक गटविकास अधिकारी हे सदस्य असणार आहेत. तसेच पशुधन विस्तार अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्याचे संस्थाप्रमुख, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, सर्व सरपंच, सर्व पोलिस पाटील, यांची सभा घेवून तालुकास्तरावर ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ मोहिम राबविण्यासंदर्भात तसेच जैव सुरक्षा विषयक प्रतिबंधाची माहिती देण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
दरम्यान, या कामी ग्रामपंचायतीकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून आवश्यक त्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. लम्पी विरोधात शेतकरीही जागृत होताना दिसत आहे. त्यामुळे येणार्या काळात लम्पी आटोक्यात येईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
गावचे सरपंच समितीचे अध्यक्ष!
गावातील लम्पी आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापना केली जाईल.या समितीचे अध्यक्ष हे सरपंच असतील, तर सदस्य म्हणून दूग्धउत्पादक डेअरीचे एक पदाधिकारी, पोलिस पाटील हे असतील. सह सदस्य सचिवपदी त्या त्या गावचे पशुधन विकास अधिकारी व सदस्य सचिव ही जबाबदारी ग्रामसेवकांकडे असणार आहे.
सीईओ येरेकर व अतिरीक्त सीईओ लांगोरे यांच्या मार्गदर्शनात गावोगावी लम्पीदूत नियुक्त केले जातील. ग्रामस्तरीय आणि तालुकास्तरीय समिती नेमून यातूनही शेतकर्यांमध्ये लम्पी प्रतिबंधासाठी ‘माझा गोठा, स्वच्छ गोठा’ या उपक्रमावर भर दिला जाणार आहे. लम्पी आटोक्यात येत आहे.
– डॉ. संजय कुमकर, पशुसंवर्धन अधिकारी, जि.प.
The post लम्पी रोखण्यासाठी गाव-तालुकास्तरावर समित्या appeared first on पुढारी.
from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/lrnzQG4
via IFTTT
0 Comments: