श्रीगोंद्याची वाटचाल ओल्या दुष्काळाकडे दुष्काळाची सहा दशकांची परंपरा खंडीत

October 14, 2022 0 Comments

https://ift.tt/Rgic4eB

श्रीगोंदा : अमोल गव्हाणे : चालू वर्षी पावसाने चांगलीच कृपा केली असून, दर दहा वर्षांनी पडणार्‍या दुष्काळाची परंपरा खंडित झाली आहे. ऑक्टोबर निम्मा संपत आला तरी पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्याची ओल्या दुष्काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे.
तालुक्यात बहुतांशवेळा सरासरीपेक्षा कमी पाऊस होतो. कुकडी-घोडच्या पाण्यामुळे उसाची पिके तग धरून राहतात. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने शेती तज्ज्ञानी चिंता व्यक्त केली होती. दर दहा वर्षांनी दुष्काळाच्या दृष्टचक्रात शेतकरी सापडत असल्याने यावर्षी दुष्काळ पडतो की काय अशी शक्यता असताना पावसाने मात्र जोरदार हजेरी लावली. गेल्या साठ वर्षांचा अभ्यास केला, तर 1972 पासून किंबहुना त्याच्याही अगोदर पासून ते 2012 पर्यतचा कालावधी पाहिला, तर दर दहा वर्षांनी तालुक्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत. 2022 मध्येही दुष्काळाला सामोरे जावे लागते की काय अशी शक्यता वर्तवली जात होती. जून महिन्यात पाऊस न झाल्याने त्या शक्यतेला अधिक पुष्टी मिळत होती. मात्र, त्यानंतर सुरू झालेला पाऊस आजही जोर धरून आहे.

यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाण्याची अडचण होणार नाही, हे गृहित धरून अनेक शेतकर्‍यांनी ऊसलागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाच्या उघडीपीनंतर ऊस लागवड गती घेईल. पावसाने सरासरी ओलांडली असून, सतत होणार्‍या पावसामुळे तालुक्याची ओल्या दुष्काळाकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खरीप हंगामातील बाजरी, तूर, मका, कपाशी ही पिके जवळपास गेल्यात जमा आहेत. हातातोंडाशी आलेला घास कधी कोरड्या दुष्काळाने तर कधी ओल्या दुष्काळाने हिरावला जात असल्याने शेतकरी नेहमीच अडचणीत सापडू लागला आहे.

सरसकट पंचनामे करण्याची मागणी
राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष शरद जमदाडे म्हणाले, खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे महसूल व कृषी विभागांकडून सुरू आहेत. ठराविक पिकांचे पंचनामे न करता सरसकट पंचनामे करून त्या पिकांची तातडीने नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.

पंचनामे करण्याच्या सूचना
तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले, प्रमाणापेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. शेतकर्‍यांनी कृषी वा महसूल विभागांशी संपर्क साधावा. नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवणार आहोत.

गाळप हंगाम लांबणार
तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यांची गाळपाची तयारी पूर्ण झाली आहे. 15 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष गाळप सुरू होणार आहे. मात्र, पाऊस थांबायला तयार नाही. ऊसतोडायचा कसा अन त्याची वाहतूक करायची कशी? हा प्रश्न असल्याने ऊस गाळप हंगाम लांबणीवर जाणार आहे.

कपाशीचे पीक हातचे गेल
आढळगाव येथील शेतकरी बापू होले यांची कपाशी पूर्ण पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या मेहनतीने हे पीक आणले होते, पण अति पावसामुळे कपाशीचे पीक हातचे गेले आहे.

कांद्याच्या चाळी खराब
अतिपावसामुळे शेतातील उभ्या पिकांची तर वाट लागली आहेच, पण भावाच्या अपेक्षेने चाळीत भरून ठेवलेल्या कांद्यालाही अतिपावसाचा फटका बसला आहे. चाळीत ठेवलेला कांदा सडू लागल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

The post श्रीगोंद्याची वाटचाल ओल्या दुष्काळाकडे दुष्काळाची सहा दशकांची परंपरा खंडीत appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/1hADt4N
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: