कर्जत : शिंदे-पवार संघर्ष पेटणार; पवारांकडून आदेशांचे उल्लंघन झाल्याची शिंदेंची तक्रार

October 11, 2022 0 Comments

https://ift.tt/D1kpWcC

कर्जत; पुढारी वृत्तसेवा: मंत्री समितीच्या सभेत झालेल्या निर्णयाचे उल्लंघन करत बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडच्या साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू केल्याची तक्रार भाजप आ. प्रा. राम शिंदे यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. आ. शिंदे यांनी ज्या साखर कारखान्याची तक्रार केली तो कारखाना राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आ. राम शिंदे व राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

2022-23 वर्षाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करावा, असा निर्णय मंत्री समितीच्या बैठकीत झालेला आहे. जे कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करतील, अशा कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या 19 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत देण्यात आले असल्याकडे आ. शिंदे यांनी साखर आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.

15 ऑक्टोबरपूर्वी कारखाने सुरू केल्यास राज्य साखर कारखाने आदेश 1984 खंड 4 चा भंग होतो. इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडने 15 ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करून कायद्याचा भंग केला आहे. 10 ऑक्टोबरलाच बारामती अ‍ॅग्रो लिमिटेडच्या साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू केल्याने कारखान्याचे कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आ. प्रा. राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

कारखाना 10 ऑक्टोबरला सुरू झाल्याचे पुरावे म्हणून आ. शिंदे यांनी छायाचित्रे व ध्वनिचित्रफितही तक्रारीसोबत जोडली आहे. साखर आयुक्तांनी चौकशी करून गुन्हे दाखल करणार असल्याचे आश्वासन दिल्याचेही आ. प्रा राम शिंदे यांनी सांगितले. बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड साखर कारखाना राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांच्याशी निगडीत आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केला होता. शिंदे यांना भाजपने विधान परिषदेवर संधी देत आमदारकी दिली आहेे. आ. शिंदे यांच्याकडे बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारीही भाजपने सोपविली आहे. त्या पार्श्वभूमीवर आ. शिंदे यांनी केलेली तक्रार पाहता भविष्यात पवार-शिंदे यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याचे चिन्हे आहेत.

The post कर्जत : शिंदे-पवार संघर्ष पेटणार; पवारांकडून आदेशांचे उल्लंघन झाल्याची शिंदेंची तक्रार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/EAal732
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: