शिर्डी : खासदार विखे धावले राज ठाकरेंच्या स्वागताला

October 02, 2022 0 Comments

https://ift.tt/ysF2xa3

शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी सपत्नीक साईदर्शन घेतले. राज ठाकरे यांचे स्वागत करण्याकरीता भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट विमानतळाकडे धाव घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलणे टाळले, पण त्यांच्या पत्नी शर्मिला यांनी मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचे काहीच वाटत नसल्याची प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचा शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांचा मुंबईत दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यावरून राज्यात राजकारण तापले आहे, याकडे लक्ष वेधले असता, शर्मिला ठाकरे यांनी तटस्थ प्रतिक्रिया देत ‘त्यांच्या’ दसरा मेळाव्याचे आम्हाला काहीही वाटत नाही,’ अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.

तत्पूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व सुविद्य पत्नी शर्मिला ठाकरे आज (शनिवारी) सकाळी शिर्डी विमानतळावर आले असता खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केल्याने उपस्थित राजकीय नेते व कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. यानंतर राज ठाकरे यांचा ताफा श्रीसाईबाबा मंदिराच्या दिशेने गेला. श्रीसाई मंदिरात त्यांनी पाद्यपुजा करून श्रीसाईबाबांची आरती केली. यावेळी श्रीसाई संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बाळा नांदगावकर, मनसे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते, राजेश लुटे, विजय मोगले उपस्थित होते.

यावेळी राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्याचे टाळले, मात्र शर्मिला ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘त्यांच्या’ मेळाव्याचं आम्हाला काहीही वाटत नाही. गेली दोन वर्षे कोरोनात गेली. त्यामुळे आम्ही श्रीसाई बाबांच्या दर्शनाला येऊ शकलो नाही. आता निर्बंध नाहीत, त्यामुळे दर्शनाला आल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार म्हणाले, मी ठाकरेंचा फॅन
भाजपचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत केल्याने राजकीय मंडळींनी भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांच्या शैलीचा माझ्या राजकीय जीवनात मोठा प्रभाव आहे. पक्ष विरहित मी त्यांचा फॅन आहे. आपल्या मतदार संघाच्या वतीने त्यांचे आदरातीथ्य करणे आवश्यक आहे, म्हणून मी स्वागत केले. त्यातून कुठला राजकीय अर्थ काढू नये, असे खा. डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.

The post शिर्डी : खासदार विखे धावले राज ठाकरेंच्या स्वागताला appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/nIViowp
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: