पर्जन्यमापकावर पावसाची चुकीची नोंद !

September 11, 2022 0 Comments

https://ift.tt/B6MghlE

ढोरजळगाव : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांत ढगफुटी सदृश पाऊस झाला. मात्र, शासनाकडून ग्राह्य धरण्यात येत असलेल्या स्कायमेट या संस्थेच्या पर्जन्यमापकावर गुरूवारी (दि.8) झालेल्या पावसाची नोंद 31.3 मिलीमीटर आहे. तर, महसूल विभागाच्या पर्जन्यमापकावर हिच नोंद 97 मिलीमीटर आहे. शुक्रवारी (दि.9) झालेल्या पावसांच्या नोंदीतही दोन्ही ठिकाणी तब्बल 14 मिलीमीटरचा फरक दिसत आहे. शासनाकडून ‘स्कायमेट’ची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येत असल्याने, त्याचा फटका मात्र शेतकर्‍यांना बसत आहे. ढोरजळगाव परिसरा गुरूवारी (दि.8) पावसाने पहाटेपासूनच सुमारे पाच तास जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ढोरा नदीला पूर आला होता.

ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले. अनेक ठिकाणी कपाशी, तूर, उसाच्या पिकात पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे कपाशी, तूर, मूग अशी हातातोंडाशी आलेली पिके वायाला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेवगाव तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले आणि मंडल कृषी अधिकारी कानिफनाथ मरकड यांनी परिसरातील गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी ग्रामस्थांशी बोलताना टकले म्हणाले की, स्कायमेट या संस्थेने बसविलेल्या पर्जन्यमापकानुसार 31.3 मिलीमीटर पावसाची नोंद ढोरजळगाव मंडळात झाली आहे. हिच आकडेवारी शासन दरबारी ग्राह्य धरली जाते. प्रत्यक्षात ढोरजळगाव येथे बसविलेल्या महसूल विभागाच्या पर्जन्यमापकावर तब्बल 97 मिलीमीटर पाऊस झाल्याचे दिसत आहे.

शासनाच्या दोन विभागाच्या पर्जन्य मापकात सुमारे 60 मिलीमीटरची तफावत आढळली. शेतकर्‍यांनी धारेवर धरल्यानंतर अधिकार्‍यांनी स्कायमेटच्या गरडवाडी येथील पर्जन्यमापकाची पाहणी केली. हे यंत्र वेड्या बाभळींनी झाकून गेले होते. त्याची वायर खराब झाल्याचे आढळून आले. दुसर्‍या दिवशी दि.9 रोजी झालेल्या पावसाच्या नोंदीमध्ये सुद्धा 19.3 आणि 33 असा चौदा मिलीमीटरचा फरक आढळून आला. प्रत्यक्ष ढगफुटी सदृश पाऊस होऊनही शासनाने बसविलेल्या दोन स्वतंत्र पर्जन्यमापकांत एवढी तफावत आढळते, या मागे काही गौडबंगाल आहे का? अशी शंका निर्माण झाली आहे. कारण, कृषी आणि महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार त्या मंडळाची आणेवारी ठरवून शेतकर्‍यांच्या पिकांची नुकसानीची पातळी निश्चित केली जाते.

नुकसान झाल्यानंतर संबधित कंपनीला तातडीने टोल फ्री नंबरवर कॉल करून त्यांचे प्रतिनिधी नुकसानीची पाहणी करतात. परंतु, पावसाची आकडेवारी ही शासनाने नेमून दिलेल्या संस्थेची ग्राह्य धरण्यात येते. त्यामुळे नुकसान होऊनही व हजारो रुपयांचा पीकविमा भरूनही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत. मागील वर्षी महसूल विभागाच्या चुकीमुळे ढोरजळगाव मंडळातील शेतकर्‍यांचे पीकविम्याचे सुमारे 50 लाखाहून अधिक रूपये पाण्यात गेले. त्यामुळे झालेल्या पावसाची वस्तुनिष्ठ नोंद होणे गरजेचे आहे. या प्रसंगी सरपंच सुधाकर लांडे, अनंता उकिर्डे, राजेंद्र देशमुख, भिवसेन केदार, कृषी पर्यवेक्षक सुनील होडशिळ, कृषी सहायक रवींद्र ढाकणे यांचेसह शेतकरी उपस्थित होते.

पावसाची नोंद ही शासनाने नेमून दिलेल्या ‘स्कायमेट’च्या पर्जन्य मापकानुसार ग्राह्य धरण्यात येते. दोन्ही पर्जन्यमापकांत तफावत आढळली. शासन स्तरावर याची माहिती कळविली जाईल.
– अंकुश टकले, तालुका कृषी अधिकारी

शासनाच्या दोन विभागाच्या पर्जन्यमापकांवर वेगवेगळी नोंद होऊन मोठी तफावत आढळते. परंतु, ढगफुटी सदृश पाऊस होऊनही स्कायमेटची कमी नोंद ग्राह्य धरली जाते. विमा कंपनी व या संस्थेत मिलीभगत असल्याची शंका येते.
– राजेंद्र देशमुख, शेतकरी, ढोरजळगाव

The post पर्जन्यमापकावर पावसाची चुकीची नोंद ! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/RyLBim5
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: