श्रीगोंदा : नगरपालिकेत अंतर्गत बंडाळी उफाळली

September 05, 2022 0 Comments

https://ift.tt/wLvRa6r

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा नगरपालिकेत अंतर्गत बंडाळी उफाळून आली असून, गटनेते मनोहर पोटे यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचेच नगरसेवक नाराज आहेत. मनोहर पोटे यांचे गटनेतेपद काढून घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कालच्या सभेत नगरपालिकेच्या कारभारावर उघड नाराजी व्यक्त करत, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पालिका कारभाराची चर्चा थांबते न थांबते, तोच आज पुन्हा पालिका वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे.

काँग्रेसच्या शुभांगी पोटे या नगराध्यक्षा असून, बहुमत मात्र भाजपकडे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांची एकत्र गटनोंदणी झालेली असून, नगराध्यक्षांचे पती व नगरसेवक मनोहर पोटे हे गटनेते आहेत. मात्र, पोटे यांच्याविरुद्ध सत्ताधार्‍यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी खदखद आहे. ते सभागृहात विश्वासात घेत नाहीत, विकासकामांबद्दल माहिती न देता थेट कामांचे वाटप होते, प्रभागातील कामेही माहिती होत नाहीत, भाजपच्या नगरसेवकांनाच जास्त जवळ करतात आदी आरोप करीत काँग्रेसच्या नगरसवेकांनी आता गटनेते पोटे हटाव मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, ही नाराजी असली तरी गटनेते मनोहर पोटे हे नाराज नगरसेवकांचे मन परिवर्तन करतात का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पोटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

अनेक दिवसांपासून नाराजी
गटनेते मनोहर पोटे हे पालिका कारभारात कुठल्याच प्रकारे विश्वासात घेत नसल्याचा सूर नगरसेवकांमधून आळविला जात होता. याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारीही झाल्या होत्या. मात्र, त्याचे निराकरण झाले नाही. ज्या कामासाठी पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेलो, तीच होत नसतील तर नगरसेवक म्हणून राहण्यात तरी काय अर्थ? असेही काहीजण खासगीत बोलून दाखवितात. ना.अजित पवार हे पालिका कारभारावर बोलले अन् पालिकेतील अंतर्गत बंडाळी उफाळून आली.

गटनेतेपदी गणेश भोस?
बंडाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांचे पुत्र गणेश भोस यांच्या हाती आहे. याबाबत त्यांनी थेट काही न सांगता उद्या याबाबत माध्यमांकडे पुरावे देऊ एवढेच सांगितले. गटनेते पदावरून मनोहर पोटे यांना हटविण्यासाठी पाच नगरसेवक जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करणार आहेत. पोटे यांना हटविण्यात आल्यास गणेश भोस यांची गटनेते पदी निवड होऊ शकते.

The post श्रीगोंदा : नगरपालिकेत अंतर्गत बंडाळी उफाळली appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/FQZBNoW
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: