नगर : पावसाने ‘माध्यमिक’चा बेरंग!

September 23, 2022 0 Comments

https://ift.tt/GAZlTfS

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून मान्यतेवरून ‘माध्यमिक’ चांगलेच चर्चेत आलेले आहे. त्यात, आता पावसानेही इमारतीला गळती लागल्याने गेल्या महिन्यात इमारतीला केलेल्या रंगरंगोटीचा देखील ‘बेरंग’ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाची इमारत दुरुस्ती करावी, यासाठी बांधकाम विभाग निरुत्साही असल्याने कर्मचार्‍यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
माध्यमिक शिक्षण विभागात अगोदरच मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे अतिरीक्त कामकाजामुळे अधिकारी, कर्मचारी हतबल झाले आहेत. त्यात कार्यालयीन इमारत आता जीर्ण झाल्याचे चित्र आहे.

गेल्यावर्षीच या इमारतीत शॉटसर्किट झाले होते. त्यानंतर इमारत दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी दक्षिण बांधकाम विभागाकडे 9 लाखांचा दुरुस्ती प्रस्ताव पाठविल्याची चर्चा होती. मात्र, निधी न मिळाल्याने काम झाले नाही. आता यावर्षी पावसाळ्यात इमारत दुरुस्तीचा विषय पुढे आला आहे. पहिल्याच पावसात इमारतीला गळती लागली होती. त्यानंतर बांधकाम विभागाने एक पानकागद इमारतीवर टाकून कर्मचार्‍यांची बोळवण केली. मात्र, तरीही ही गळती थांबली नाही. कालच्या पावसात, तर शिक्षण विभागातील संगणक व अन्य साहित्यावर पानकागद टाकल्याचे दिसले. तर कर्मचार्‍यांच्या डोक्यावरही पावसाचे पाणी टिपकत असल्याने त्यांची धावपळ पहायला मिळाली. त्यामुळे बुधवारी माध्यमिक शिक्षण विभागात बहुतांशी काम बंद असल्याने जणू हा विभागच ‘गारठला’ असल्याचे पहायला मिळाले.

‘मान्यते’चेही भिजते घोंगडे!
माध्यमिक शिक्षण विभागात काल दुपारी काहीजण शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक मान्यतेच्या कामांसाठी आले होते. मात्र, पावसाने कार्यालयात गळती लागल्याने संगणक पानकागदाने झाकून ठेवले होते. त्यामुळे अनेकांची कामे न झाल्याने त्यांना कागदपत्रांच्या ‘बॅगा’ घेवून मागे जावे लागले.

राऊत म्हणाले.. मला एवढेच माहिती!
बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवाजी राऊत यांना दुरुस्ती प्रस्तावाबाबत विचारले असता, माध्यमिक शिक्षण विभागाची इमारत दुरुस्तीचा प्रस्ताव आपण वर्षभरापूर्वी पाठवला होता. आपण तो प्रस्ताव पाठवला होता, मात्र त्याविषयी पुढे काय झाले, याविषयी मला माहिती नाही, असे उत्तर दिले.

The post नगर : पावसाने ‘माध्यमिक’चा बेरंग! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/UmpEMwf
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: