पाणी योजनेला हवाय तांत्रिक बुस्टर ! खासगी संस्थेच्या मदतीने गळती थांबणार

September 17, 2022 0 Comments

https://ift.tt/7M3Xgt9

सूर्यकांत वरकड : 

नगर : पाणी योजनेेचा वर्षाकाठी खर्च तीस कोटी आहे. त्यातील ऐंशी टक्के पैसे वीजबिलापोटी द्यावे लागतात. अपुर्‍या व कुशल कर्मचार्‍यांअभावी वितरणाचा बट्ट्याबोळ होत आहे. पाणी गळती, चोरी होत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी खासगी संस्थेची मदत घेण्याचे ठरविले आहे. त्यातून पाणी गळती, चोरीसह पाण्याचा अपव्यय रोखण्यास मदत होणार असून, खर्चामध्ये बचत होणार असल्याचा दावा महापलिका अधिकार्‍यांकडून केला जात आहे. मुळा धरणावरून पाणी योजना असूनही नगर शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. अनेक भागातील नागरिक पाणी मिळत नाही, म्हणून वर्षांनुवर्षे मनपामध्ये हेलपाटे मारत आहेत. मात्र, त्यावर अद्यापपर्यंत तोडगा काढण्यात मनपा अधिकार्‍यांना यश आलेले नाही.

आठवड्यात एक तरी मोर्चा मनपामध्ये येतो आणि मुबलक पाणी द्यावे, अशी मागणी करतो. नगर शहराला दररोज 90 दशलक्ष लिटर पाण्याची मागणी आहे. त्यात तुलनेत 82.85 लदशक्ष लिटर शहराला मिळतेे. दिवसाला प्रत्येक नागरिकामागे 135 लिटर पाणी मनपाला मिळणे आवश्यक आहे. मात्र, तितके पाणी मिळत नाही. मुळा धरण ते विळद आणि विळद ते वसंत टेकडी असा पाण्याचा प्रवास होतो. वसंत टेकडी येथून शहरातील पाण्याच्या टाक्या भरविल्या जातात. मग, पाणी नागरिकांना वितरित केले जाते. त्यातील काही नागरिकांना अपेक्षापेक्षा जास्त पाणी मिळते, तर काही नागरिकांना पाणीच मिळत नाही अथवा कमी पाणी मिळते. या पाण्याची कोठही मोजदाद होत नाही. मनपाकडे तशी सक्षम यंत्रणा नाही.

मनपाकडे पाणीपुरवठा विभागात कर्मचार्‍यांची मोठी कमतरता असून, कुशल कर्मचार्‍यांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी देण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक साह्याची गरज असल्याचे निरीक्षण अधिकार्‍यांनी नोंदविले आहे आणि तसा प्रस्ताव तयार केला आहे.

तांत्रिक सल्लागार संस्थेच्या साह्याला मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागनिहाय पाण्याची मागणी आणि पाणीपुरवठा याचा ताळमेळ तपासला जाईल. पाणी कुठे लिकेज होते किंवा पाण्याची चोरी होते, याचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करता येईल. तसेच, त्या भागातील नागरिकांना मीटरद्वारे पाणी घेण्याचा आग्रह करण्यात येईल. जेणेकरून स्मार्ट रिडिंगद्वारे पाण्याची मोजदाद करण्यात येईल. त्यामुळे कोणत्या भागाला किती पाणी लागते आणि किती पाणी मनपा देते, हे निश्चित होईल. त्यामुळे पाण्याची चोरी, लिकेज आणि पाण्याचा अपव्यय थांबेल, असा दावा अधिकार्‍यांकडून केला जात आहे.

दरम्यान, मुंबई, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अशा तांत्रिक सल्लगार संस्थेची मदत घेतली जात आहे. त्यामुळे पंप हाऊस, ट्रान्सफार्मर अशा यंत्राचे वेळोवेळी मेंटेनन्स होत असल्याने तांत्रिक बिघाड होत नाही. फार कमी वेळा पाणी उपसा बंद ठेवावा लागतो, असे त्या प्रस्तावामध्ये म्हटले आहे.

मनपा काम करून घेणार
पाणी योजनेतील तांत्रिक दुवे शोधण्यासाठी आणि तांत्रिक मदत घेण्यासाठी तांत्रिक सल्लागार बाह्य संस्थेची मदत घेतली जाणार आहे. पाणी योजना बाह्य संस्थेला दिली जाणार नाही. पाणी योजनेवर मनपाची मालकी राहणार आहे. त्यामुळे पाणी योजनेबाबत मनपा आणि नागरिक असा संबंध राहणार आहे. मनपा बाह्य संस्थेकडून पाणी योजना चालविण्यासाठी मदत घेणार आहे, असे सूत्रांकडून समजले.

मालमत्ता 90 हजार अन्  नळ कनेक्शन 60 हजार
मनपा हद्दीत दिवसेंदिवस मालमत्तांची संख्या वाढत असून, नवनवीन वसाहती वाढत आहेत. मात्र, त्या तुलनेत नळकनेक्शन वाढताना दिसत नाहीत. खुले प्लॉट, मनपा मालमत्ता, दुकाने, बंगले, घरे अशा एकूण एक लाख 20 हजार मालमत्ता आहेत. त्यातील 90 हजार कुटुंब आहेत. 90 हजार कुटुंबांपैकी 60 हजार कुटुंबाकडे मनपाचे अधिकृत नळ कनेक्शन आहे. उर्वरित 30 हजार मालमत्ताधारक कुठून पाणी घेतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनपा त्यांच्याकडून सर्वसाधारण पाणीपट्टी वसूल करीत असली तरी ती अत्यंत तोकड्या प्रमाणात आहे. तांत्रिक साह्या घेतल्यानंतर ही बाब समोर येईल आणि मनपाच्या उपन्नामध्ये वाढ होईल, असाही मनपा अधिकार्‍यांचा दावा आहे.

पाणी योजनेसाठी तांत्रिक सल्लागार संस्थेचे साह्य घेणे म्हणजे योजनेचे खासगीकरण नव्हे. तर, नागरिकांना वेळेत व मुबलक पाणी देण्यासाठी आणि त्यातून वाया जाणार्‍या पाण्यातून उत्पन्न मिळण्यासाठी तांत्रिक साह्याची गरज आहे. त्यामुळे मनपाचा पैसा वाचणार असून, उत्पन्न वाढणार आहे. तसेच, नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.
                                                               -परिमल निकम,  जलअभियंता, मनपा

The post पाणी योजनेला हवाय तांत्रिक बुस्टर ! खासगी संस्थेच्या मदतीने गळती थांबणार appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/32Q1kGq
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: