शेतकर्‍यांसमोर घोंगावतेय दुहेरी नैसर्गिक संकट

September 05, 2022 0 Comments

https://ift.tt/EJeUcb8

ढोरजळगाव : पुढारी वृत्तसेवा :  शेतकर्‍यांसमोर सतत काही ना काही संकटे येत असतात. कधी नैसर्गिक, तर कधी सरकारी धोरण. आता नव्यानेच जनावरांमध्ये होणारा त्वचारोग म्हणजे लम्पी स्किन डीसिज आणि ऊस, गवतावर आढळणारी घोणस अळी, असे दुहेरी संकट शेतकर्‍यांसमोर उभे ठाकले आहे. ही अळी माणसाच्या शरीरावरही परिणाम करणारी आहे. आफ्रिकन देशात आढळणारा ‘लम्पी स्किन डीसिज’ हा जनावरांमध्ये होणारा त्वचारोग. त्याचा वेगाने प्रसार महाराष्ट्रात होत असून, नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील अनेक जनावरांमध्ये लागण झाली आहे.

यामुळे पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे. माश्या, डास, गोचिड आदींमार्फत प्रसार होणार्‍या या संसर्गजन्य आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते, लासिकाग्रंथीना सूज येऊन भरपूर ताप येतो, त्वचेवर 10 ते 50 मिमी व्यासाच्या गाठी मान, पाय, डोके, मायांग, कास आदी ठिकाणी येतात. डोळे, नाकांमध्ये व्रण निर्माण होतात. त्यामुळे जनावरांना चारा चघळता येत नाही. डोळ्यांतील व्रणामुळे चिपडे येऊन दृष्टी बाधित होते. फुफ्फुसाचा आणि स्तनाचा दाह होऊन जनावर दगावण्याची शक्यता असते. शेवगाव तालुक्यात सध्या एकही जनावर बाधित नसले, तरी शेजारील नेवासा तालुक्यातील देवसडे येथे अशी लक्षणे जनावरांमध्ये आढळल्याने पाच किलोमीटर परिघातील गावांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण केले जात आहे.

घोणस आळीचाही प्रादुर्भाव
दिवसेंदिवस वातावरणात बदलांचा परिणाम शेतकर्‍यांच्या पिकांवर होत असताना ऊस आणि गवतावर घोणस नावाची हिरवट पिवळ्या रंगाची अळी आढळून येते. तिचा परिणाम केवळ पिकांवर न होता माणसांवरही होत असून, हा घातक परिणाम दिसून येत आहे. या अळीच्या त्वचेला स्पर्श झाल्यास त्वचेला खाज सुटून असह्य वेदना होते. नंतर उलट्या होऊ लागतात, अर्धे शरीर बधिर पडून जीभ अडखळून बोलताही येत नाही. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात तीन व नगर तालुक्यात चार असे सात रुग्णांबरोबर शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथील एका महिलेस उपचारार्थ रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. या अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच ही अळी अंगावर येऊ नये, याची खबरदरी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अगोदरच दुधाला भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी या दुहेरी नैसर्गिक संकटामुळे भीतीचे वातावरण निर्माण आहे.

घोणस अळी ही हिरवट पिवळ्या रंगाची असून, ती रानटी गवतावरील अळी आहे. ती चावल्याने असह्य वेदना होतात. उलट्या होतात. त्यामुळे अळी अंगावर येऊ नये, म्हणून शेतकर्‍यांनी अंगभर कपड्यांचा वापर करावा. जास्त प्रादुर्भाव असल्यास क्लोरोसायापरची फवारणी करावी. अळी कुठे आढळल्यास कृषी सहायकांशी संपर्क साधावा.
                                                            – गणेश वाघ, मंडळ कृषी अधिकारी.

The post शेतकर्‍यांसमोर घोंगावतेय दुहेरी नैसर्गिक संकट appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/QYJvUoF
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: