नगर तालुका बनणार कांद्याचे आगार..! 50 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी

August 02, 2022 0 Comments

https://ift.tt/cnKJaV5

नगर तालुका; पुढारी वृत्तसेवा: नगर तालुक्यातील 11 मंडळामध्ये 50 हजार 76 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, मूग व सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असून, बाजरीच्या क्षेत्रात मात्र घट झाल्याचे दिसून येत आहे. नगर तालुका हा कमी पर्जन्यछायेचा भाग म्हणून ओळखला जातो. चालू वर्षी पावसाच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाल्याने जवळपास तालुक्यातील सर्वच भागांत खरीप पेरण्या उरकण्यात आल्या आहेत. मूग, सोयाबीन या पिकांच्या पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बाजरीच्या क्षेत्रात घट झाल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. आजमितीला मूग तेरा हजार 793 हेक्टर, सोयाबीन बारा हजार 496 हेक्टर, तर बाजरी अवघी 4 हजार 769 हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आली आहे.

मूग, बाजरी, सोयाबीन, कडधान्य पिके, तेलबिया पिके, चारा पिके सर्व मिळून 50 हजार 76 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मूग व सोयाबीन, बाजरीची पिके जोमात आहेत. परंतु काही प्रमाणात बाजरी पिकाच्या गाभ्यामध्ये अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. शेतकर्‍यांची लाल कांद्याचे रोप टाकण्यासाठी लगबग सुरू आहे. काही शेतकर्‍यांनी रोप टाकून उगवून आली आहेत.
साधारणपणे आषाढी एकादशीपासून लाल कांद्याची रोपे टाकण्यास शेतकरी सुरुवात करतात.

परंतु तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कांद्याच्या रोपांसाठी 15 ते 20 दिवस उशीर झाला आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला लाल कांद्याची लागवड करण्यात येते. परंतु रोपे टाकण्यासाठी उशीर झाल्याने कांदा लागवडही 15 ते 20 दिवस पुढे ढकलणार आहे. चालू वर्षी शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त घरगुती बियाणांचा रोप टाकण्यासाठी वापर केल्याचे दिसून येत आहे. लाल कांद्याच्या रोपांवर बुरशीजन्य प्रादुर्भाव मर होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. नगर तालुक्याला पूर्वी ज्वारीचे पठार म्हणून ओळखले जात होते. परंतु सद्यस्थितीत ज्वारीचे उत्पन्न अत्यल्प प्रमाणात घेतले जात आहे.

तालुक्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. लाल कांद्याच्या उत्पादनासाठी तालुक्यातील ससेवाडी, इमामपूर, बहिरवाडी, जेऊर परिसर राज्यात प्रसिद्ध आहे. ज्वारीचे पठार म्हणून ओळख पुसत जाऊन कांदा उत्पादनासाठी तालुका अग्रेसर होत असल्याचे चित्र गेल्या दशकात दिसून आले आहे. चालू वर्षी देखील वातावरणाने साथ दिल्यास कांद्याचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे चिन्ह कांद्याच्या टाकण्यात आलेल्या रोपांवरून दिसत आहे.

डोंगर उताराच्या जमिनीमुळे पाण्याचा निचरा होत असल्याने लाल कांदा या परिसरात मोठ्या प्रमाणात उत्पादित होत असतो. डोंगरालगतची जमीन विकसित करून सिंचनाखाली आणण्यात आल्याने पूर्वी तेथे ज्वारीचे पीक घेतले जायचे. त्या क्षेत्रावर आता कांद्याची लागवड करण्यात येत आहे. पर्यायाने ज्वारीचे क्षेत्र घटत जाऊन कांद्याचे उत्पादन वाढत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात मूग, सोयाबीन व बाजरीची पिके जोमदार अवस्थेत दिसून येत आहेत. काही भागात मूग फुलोर्‍यात आले आहेत. खरीप पिकांची खुरपणी उरकून शेतकरी वर्ग आता कांदा लागवडीच्या नियोजनात व्यस्त झाले आहेत.

मंडळनिहाय बाजरी, मूग, सोयाबीनचे क्षेत्र
नालेगाव ः 32- 134-219, सावेडी ः 62- 50- 515,
कापूरवाडी ः 240-724- 599, केडगाव ः 444- 2752- 135, भिंगार ः 382- 625- 2739, नागापूर ः 231- 479- 724,
जेऊर ः 908- 2729- 1079, चिचोंडी पाटील ः 208- 438- 4902, वाळकी ः 968-1058-419, चास ः 666- 4336-124, रुईछत्तीसी ः 628-468- 1041.

शेतकर्‍यांना हमीभाव द्या : कर्डिले
बाजरी, मूग, तसेच सोयाबीनचे पीक जोमदार आहेत. परंतु उत्पन्न हातात येईपर्यंत काहीच सांगता येत नाही. पीक काढणीच्या वेळेस पाऊस लागून राहिल्यास संपूर्ण नुकसान होऊन जाते. तीच परिस्थिती कांदा लागवडीनंतर निर्माण होते. धुके, दव, ढगाळ वातावरण व संततधार पावसामुळे कांदा पिकाला फटका बसतो, तसेच हमीभाव मिळत नाही. शेतकर्‍यांचे जीवन हे निसर्गावरच अवलंबून आहे, असे मजले चिंचोलीचे शेतकरी कारभारी कर्डिले यांनी सांगितले.

कीटकनाशक फवारणी, पाण्याचे नियोजन हवे
सद्यस्थितीत बाजरी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी कीटकनाशक फवारणी करणे गरजेचे आहे, तसेच कांद्याच्या रोपांवर बुरशी व मरीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. त्यामुळे चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक औषध पाण्यातून द्यावे, तर रोपाला पाणी देण्याचे प्रमाण हे वापसा पाहूनच द्यावे. पाण्याचे प्रमाण जास्त होता कामा नये, साईनाथ कृषी उद्योगचे संदीप काळे यांनी सांगितले.

The post नगर तालुका बनणार कांद्याचे आगार..! 50 हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/bLotJ0n
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: