राहुरी : कानडगावच्या 188 सभासदांना दणका

August 26, 2022 0 Comments

https://ift.tt/YMGN5rS

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव, तुळापूर सेवा संस्थेच्या सभासदांचे सदस्यत्व रद्दचा दणका बसल्यानंतर कानडगावच्या त्या 188 सभासदांनाही हादरा बसला आहे. 261 सभासदांच्या नावे 10 गुंठे क्षेत्र नसल्याने संबंधितांचे सभासदत्व रद्द व्हावे, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, राहुरीच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये तक्रारदार व सभासदांना बोलावून घेत सुनावणी घेतली. काहींनी सात-बारा उतारे दाखल केले, तर काहींनी कर्ज काढल्याचे प्रमाणपत्र दिले. यानुसार 261 पैकी तब्बल 188 सभासदांचे सदस्यत्व सहकार अधिनियम 1960 कलम 11 आणि 25 अ अन्वये रद्द केल्याचा आदेश जारी झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील सेवा संस्थेच्या 261 सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये अर्ज दाखल झाला होता. त्यानुसार सहाय्यक निबंधक नागरगोजे यांच्या मार्गदर्शनामध्ये वेळोवेळी सुनावणी घेण्यात आली. 18 एप्रिल 2022 रोजी तक्रार अर्ज देण्यात आला होता. यानंतर सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये 23 मे, 2 जून, 6 जून, 15 जून, 1 जुलै, 7 जुलै, 14 जुलै, 27 जुलै या तारखांना अर्जदार व सामनेवाले 257 सभासदांची सुनावणी झाली. यावेळी अर्जदार भगवान भाऊराव गागरे व इतर 2 (रा. कानडगाव ता. राहुरी) यांनी म्हणणे मांडले.

तक्रार करण्यात आलेल्या त्या 261 सभासदांच्या वतीने अ‍ॅड. अशोक तनपुरे यांनी म्हणणे सादर केले. यावेळी सहाय्यक निबंधकांच्या आदेशानुसार संबंधित सभासदांच्या नावे किमान 10 गुंठे क्षेत्र असल्याचे दाखले सादर करण्यास सांगितले होते. तलाठी यांच्याकडून प्रमाणित यादी सादर करण्यात आली. त्यामध्ये 69 सभासदांच्या नावे 10 गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असल्याची माहिती निबंधक कार्यालयास देण्यात आली, तर कर्ज घेतलेल्या एका सभासदांचे तसेच गावठाण हद्दीमध्ये असलेल्या क्षेत्रावर इतर हक्कामध्ये नोंद असलेल्या त्या दोन सभासदांचे सभासदत्व रद्द न करण्याचा आदेश झाला, परंतु 10 गुंठे क्षेत्र नसलेल्या व सेवा संस्थेशी कोणताही व्यवहार नसलेल्या 188 सभासदांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश सहाय्यक निबंधक नागरगोजे यांनी पारित केला आहे.

तक्रार अर्जानुसार 69 सभासद हे 10 गुंठे क्षेत्र असलेले, तर इतर दोघे कर्जदार असल्याने संबंधितांचे सभासदत्व वाचले. दरम्यान, कानडगाव परिसरामध्ये आदेश पारित होताच एकच खळबळ उडाल्याचे चित्र दिसले आहे. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव व तुळापूर सेवा संस्थेमध्ये यापूर्वी सभासद अपात्रतेसाठी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार दोन्ही सेवा संस्थांतील अपात्र सभासदांना सहाय्यक निबंधक कार्यालयातून दणका बसला होता.

त्यानंतर कानडगाव सेवा संस्थेबाबतही वेळोवेळी सुनावण्या होऊन अखेर 188 जणांवर अपात्रतेचा शिक्कामोर्तब झाल्याने सहकार खात्यामध्ये चर्चेचे गुर्‍हाळ रंगले आहे. सेवा संस्थेच्या निवडणुकांचा बार सुरू आहे. अनेक सेवा संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच सभासद अपात्रतेचा दणका सुरू असल्याचेही चित्र आहे.

आता राहुरी खुर्द सेवा संस्थेकडे लक्ष..!
राहुरी खुर्द येथील सेवा संस्थेमध्ये 98 सभासदांचे सदस्यत्व रद्दचा अर्ज दाखल झालेला आहे. तुळापूर, म्हैसगाव व कानडगावप्रमाणेच याही संस्थेची सुनावणी घेऊन योग्य तो आदेश दिला जाणार असल्याची माहिती राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक नागरगोजे यांनी दिली.

सहकार क्षेत्रात भ्रष्टाचार नकोच : हिरगळ
सहकार क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी भ्रष्टाचार थांबणे गरजेचे आहे. अनेक संस्थांमध्ये अनधिकृतपणे सभासदत्व घेतलेले खर्‍या सभासदांवर अन्याय करतात. त्यानुसार सहकार खात्याने दिलेला आदेश हा सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे सोपानराव हिरगळ यांनी सांगितले.

The post राहुरी : कानडगावच्या 188 सभासदांना दणका appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/amkKeGi
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: