नगर : ‘पोर्टल’मध्ये अडकल्या आंतरजिल्हा बदल्या!

July 23, 2022 0 Comments

https://ift.tt/EMR528f

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सुमारे 11 हजार शिक्षकांची ऑनलाईन पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला सुरुवात होणार होती. परंतु, संबंधित पोर्टलच बंद पडल्याच्या चर्चेने ‘नगर’मध्ये येण्यासाठी उत्सुक असलेल्या ‘त्या’ 450 गुरुजींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. आता सोमवारनंतरच ही प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याचे संकेत आहेत. शिक्षकांच्या पारदर्शी बदल्यांसाठी शासनाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे.

या पोर्टलवर सध्याच्या शिक्षक बदली प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात सुमारे 11 हजार शिक्षकांची माहिती अपलोड करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार होती. या बदल्यांतून ‘नगर’मध्ये येण्यासाठी अनेक शिक्षक आशावादी आहेत. आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने मागील काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाने तसा अहवाल तयार केला होता. यामध्ये बिंदूनामावलीनुसार जिल्ह्यात 450 पदे रिक्त असल्याचे शासनाला कळविले होते. त्यानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी या पदांची मंजुरी मिळाली आहे.

आता जिल्ह्यातील रहिवासी असलेले, परंतु, अन्य जिल्ह्यांतील शाळांवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना आपल्या जिल्ह्यात परतण्यासाठी ‘आंतरजिल्हा बदली’ ही मोठी संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी शासनाच्या ऑनलाईन बदली धोरणानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना चार जिल्ह्यांची ऑनलाईन नोंदणी करताना निवड करावी लागते.

यामधील ज्या ठिकाणी बदली होईल, त्या ठिकाणी गेल्यानंतर शिक्षण विभाग पदस्थापना देते. यात ‘नगर’साठी इच्छुकही अधिक असून, जागा देखील 450 आहेत. त्यामुळे या प्रक्रियेतून अनेक शिक्षक आपल्या जन्मभूमीत ज्ञानदान करण्यासाठी येणार आहेत. गेल्या सोमवारपासूनच आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला सुरुवात होणार होती. मात्र, अचानक पोर्टलमध्ये बिघाड झाल्याने शिक्षकांचा हिरमोड झाला. आता पोर्टल सुरळीत झाल्यानंतरच त्यांना अर्ज अपलोड करावे लागणार आहेत. त्यानंतर बदल्या होऊन पुढे पदस्थापना मिळणार आहे. दरम्यान, सध्या तरी बदल्यांचे पोर्टल नेमके कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागलेले आहे.

जिल्ह्यांतर्गत बदल्यांचीही प्रतीक्षा!
शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ही तीन टप्प्यांत होणार आहे. यामध्ये पहिला टप्पा हा शिक्षक माहिती अपडेट करण्याचा होता. तो पूर्ण झालेला आहे. आता दुसर्‍या टप्प्यात आंतरजिल्हा बदल्यांची प्रतीक्षा आहे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत. या बदल्यांकडेही अनेक शिक्षकांचे डोळे लागले आहेत.

बिंदूनामावलीनुसार जागा
खुलावर्ग ः 131
अनुसूचित जाती ः 70
अनुसूचित जमाती ः 154
इतर मागासवर्गीय ः 50
आर्थिक दुर्बल घटक ः 45
एकूण मंजूर पदे ः 450

The post नगर : ‘पोर्टल’मध्ये अडकल्या आंतरजिल्हा बदल्या! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/UnoTlev
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: