नगर :जिल्ह्यात अडीचशे सरपंच थेट जनतेतून!

July 18, 2022 0 Comments

https://ift.tt/jDK59pe

नगर : पुढारी वृत्तसेवा ; जिल्ह्यातील 265 ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्‍यांचा कालावधी डिसेंबरअखेर संपत आहेत. त्यापैकी 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उर्वरित 250 ग्रामपंचायतींच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता आहे. मात्र, या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे या गावांत आता सरपंचपदासाठी मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

फडणवीस सरकारच्या काळात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2019 पर्यंत जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झालेली आहे. सन 2016 व 2017 या वर्षी झालेल्या निवडणुकीत देखील सरपंचपद जनतेतून निवडले होते.

जवळपास 265 ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीत संपत आहे. मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आले. या सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय रदृ केला. त्यामुळे सध्या सदस्यांमधून सरपंच निवडला जात आहे.

जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये नगर जिल्ह्यातील 60 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने पावसाचे कारण देत, अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकत फक्त 15 ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

त्यानुसार संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक, बिरेवाडी व निमज, नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट, भातोडी पारगाव व पिंपळगाव उज्जैनी, कर्जत तालुक्यातील बजरंगवाडी, कोरेगाव व कुळधरण, राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी, वाघाचा आखाडा व जातप, तसेच श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा व अरणगाव दुमाला, शेवगाव तालुक्यातील विजयपूर या ग्रामपंचायतींसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होत आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक मात्र, सदस्यांतूनच होणार आहे.

दरम्यान, राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकारचा निर्णय रद्द करून, सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे. त्यानुसार डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 250 ग्रामपंचायतींच्या निवडणुका दिवाळीच्या आसपास होण्याची शक्यता आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे आता आर्थिक प्रबळ आणि लोकप्रिय असणार्‍या व्यक्तींचीच सरपंचपदी निवड होणार आहे.

जोर्वे, काष्टी, राजूरचा समावेश
माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे जोर्वे, आमदार बबनराव पाचपुते यांची काष्टी, आमदार आशुतोष काळे यांचे माहेगाव देशमुख, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे राजूर, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे कमालपूर, माजी आमदार अरुण जगताप यांचे बनपिंप्री, माजी आमदार घुले बंधू यांचे दहिगाव-ने या राजकीय महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींसह 250 गावांतील सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे.

डिसेंबरअखेर मुदत संपणार्‍या ग्रामपंचायती
अकोले 56, नेवासा 13, जामखेड 3, नगर 28, राहाता 12, पारनेर 16, राहुरी 11, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 6, शेवगाव 12, पाथर्डी 11, संगमनेर 38, कर्जत 8, कोपरगाव 26.

The post नगर :जिल्ह्यात अडीचशे सरपंच थेट जनतेतून! appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/h7xkmvN
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: